Breaking News

उद्धव ठाकरेंचे सरकार माफिया सरकार

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप; माणगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

माणगाव : प्रतिनिधी

कोविड काळात दापोलीमध्ये बेकायदा रिसॉर्ट बांधणार्‍या मंत्र्याची राज्याचे मुख्यमंत्री बाजू घेत आहेत. याला काय म्हणावे, असा सवाल उपस्थित करून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 26) माणगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंचे हे सरकार माफिया सरकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या वेळी केला. राज्याचे परिवहनमंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी दापोली येथे निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांचे शनिवारी दुपारी माणगाव बसस्थानकाजवळ भाजपतर्फे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. या वेळी ‘किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. त्या वेळी सोमय्या बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार भ्रष्टाचारी आहे. यातील अनेक मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत. ते कोविड काळातही कमाई केल्याशिवाय राहात नव्हते. त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर यांनी तर कोविड केअर सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट घेतले. ज्या माणसाची कंपनी अस्तित्वात नाही, ज्यांच्याकडे कंपाउंडर नाही त्यांना पाच कोविड सेंटर देण्यात आली. 100 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट दिले आणि 38 कोटींचे कॅश पेमेंटही केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे हे सरकार माफिया नाही म्हणायचे तर काय म्हणायचे, अशी टीका सोमय्या यांनी केली. या वेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे,  तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नाना महाले, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे, यशोधरा गोडबोले, हेमा मानकर, अश्विनी महाडिक, शिला सोनार, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, चिन्मय मोने, तालुका अध्यक्ष विशाल गलांडे, अरुण पेणकर, संजय जाधव यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत  किरीट सोमय्या यांचे स्वागत केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply