नवी मुंबई : प्रतिनिधी
कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान महत्त्वाचे असते. यावरूनच विकासाचे मोजमाप ठरते. त्यामुळे आमचे राज्य सरकार गेली 50 वर्षे या देशामध्ये यशस्वीपणे वाटचाल करणार्या माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 25) येथे दिली. ते माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात बोलत होते.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडींचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 86व्या जयंतीनिमित्त आणि माथाडी युनियन, माथाडी कायदा व माथाडी पतपेढीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त एपीएमसी येथील कांदा-बटाटा लिलावगृहात माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रमुख अतिथी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, माथाडी कामगार चळवळीचे हे व्यासपीठ असेच यापुढेही चालू राहिले पाहिजे. आम्ही या चळवळीत कधीही फूट पाडणार नाही. उलट यापुढे माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी उभे राहून माथाडींचे सर्व प्रश्न सोडविले जातील. त्यांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेतून ते शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्ही कधीही माथाडी कामगार चळवळीच्या बळकटीला नख लावण्याचे काम करणार नाही. आमची पूर्ण ताकद या चळवळीच्या पाठीशी असेल. महाराष्ट्राची माती देशाला दिशा देण्याचे काम करते. माथाडी हा ताठ मानेने जगला पाहिजे यासाठी आम्ही कामगारांच्या पाठीशी उभे राहू, असे सांगितले.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माथाडी कामगार नेते व युनियनचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचीही समयोचित भाषणे झाली. माथाडी नेते आणि युनियनचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी प्रास्ताविकात कामगार चळवळीचा आढावा घेतला.
या मेळाव्यास खासदार राजन विचारे, आमदार सर्वश्री शिवेंद्रराजे भोसले, प्रसाद लाड, मंदा म्हात्रे, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, विजय सावंत, रमेश शेंडगे, भाजप नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेना नेते विजय नाहटा, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, युनियनच्या कायदेशीर सल्लागार अॅड. भारती पाटील, युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, डॉ. हणमंतराव अण्णासाहेब पाटील यांच्यासह माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 17 माथाडी कामगारांना माथाडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच माथाडी कायद्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या तेजोमय संघर्षाची सुवर्ण वाटचाल या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख व रचना बोराडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माथाडी नेते व युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी मानले.