Breaking News

पालीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; नागरिक त्रस्त

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक देवस्थानापैकी एक धार्मिक स्थळ आहे. तसेच पाली हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने पालीत नेहमीच नागरिक व भाविकांची वर्दळ असते. मात्र अरुंद रस्ते व भाविकांची वाहने यामुळे पालीत वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. खाजगी, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरूंद रस्ते तसेच  रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यामुळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते. सुट्टयांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येवून वारंवार अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.  पालीतील वाहतूक कोंडीवर ठोस उपाय निघत नसल्याने सारे त्रासले आहेत. वाहतूक समस्येमुळे पाली शहरातील रस्ते हे एकेरी करण्यात आले आहेत. या समस्येवर आमदार रविशेठ पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. पालीत सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय असलेला बायपास (मार्ग) केवळ घोषणेत अडकल्याचे दिसत आहे.   श्री बल्लाळेश्वर मंदिर येथे व विळे भागाड, माणगावकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे पाली शहरातील वाहतूक समस्या जटिल होत चालली आहे. वाहतूक समस्येचा स्थानिक प्रवाशांना तसेच भाविकांना त्रास होऊ नये, याकरिता शहरातील महत्वाच्या नाक्यांवर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येते. पाली शहरास बाह्यवळण रस्ता कोणत्याही योजनेतून मंजूर नाही. परंतु पाली-पाटनूस रस्त्यास पर्यायी रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत प्रस्तावित आहे. या पर्यायी रस्त्यासाठी भूसंपादनाच्या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. मात्र अद्याप पाली-बलाप बायपास मार्ग प्रक्रियेला कोणत्याही प्रकारची गती मिळताना दिसत नाही. पालीप्रमाणेच सुधागड तालुक्यातील परळी बाजारपेठदेखील सतत वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेली दिसते.

Check Also

एक मुलाखत : यशस्वी माजी विद्यार्थ्याची

शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीत लोकनेते रामशेठ ठाकूर झाले भावूक पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …

Leave a Reply