शिधापत्रिका धारक व दुकानदारांमध्ये खटके; रास्तभाव दुकानदार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
पाली : प्रतिनिधी
नादुरूस्त ई-पॉस मशीन तसेच इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे सुधागड तालुक्यातील रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत आहेत. परिणामी शिधापत्रिका धारकांना धान्य मिळवितांना अडचण निर्माण होत आहेत. दुकानदारांचीदेखील गैरसोय होत आहे. परिणाम शिधापत्रिका धारक व दुकानदारांमध्ये खटके उडत आहेत. यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्यासाठी रास्तभाव दुकानदार संघटनेतर्फे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना निवेदन देण्यात आले.
मागील काही दिवसांपासून इंटरनेट अभावी रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने सुधागड तालुक्यातील धान्य वितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे रास्तभावातील धान्याचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर धान्य वेळेवर न मिळाल्याने दुकानदार आणि शिधापत्रिकाधारक यांच्यात भांडणेदेखील होत आहेत.
दरम्यान, सुधागड तालुका रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी, पीठू डूमणा, चंद्रकांत घायले, अतुल मुजुमदार, अरविंद फणसे, सुरेश दंत यांच्यासह तालुक्यातील दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन तातडीने दुरुस्त करण्यात याव्यात, अन्यथा ई-पॉस मशिन जिल्हा पुरवठा विभागाकडे परत करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हा पुरवठा अधिकार्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात अडचणी येत आहेत. मात्र आम्ही विक्री रजिस्टरवरून नोंदी ठेवून कार्डधारकांना धान्य वितरण सुरू ठेवणार आहोत. मात्र ई-पॉस मशिन तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.
-अनुपम कुळकर्णी, तालुका अध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना, सुधागड