तेरा कोटी लोकसंख्येच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचा मुख्यमंत्री दोन-दोन वर्षे मंत्रालयाकडे फिरकत देखील नाही ही बाब कुणालाही खटकण्याजोगी नाही का? तंत्रज्ञानामुळे बहुसंख्य गोष्टी घरबसल्या पार पाडता येतात हे खरे असले तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे कार्यमग्न असणे देखील जनतेला दिलासा देणारे असते. ही कार्यमग्नता महाराष्ट्राच्या जनतेला कधी पहायला मिळणार आहे?
तब्बल 25 महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चरणधूळ एकदाची मंत्रालयाच्या पायरीला लागली आणि ती सरकारी वास्तू धन्य-धन्य झाली. दोन वर्षांहून अधिक काळ मंत्रालयातील कारभार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीविनाच चालत होता. राज्याच्या कारभाराची मंत्रणा जेथे होते त्या वास्तूस मंत्रालय म्हणावे अशी व्याख्या कैक दशकापूर्वी केली गेली होती. त्यानुसार सचिवालयाचे नामकरण मंत्रालय असे करण्यात आले. त्यानंतरच्या अनेक दशकांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज्याच्या कारभाराची मंत्रणा या इमारतीतून होते यावरचा विश्वासच उडाल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात अधूनमधून हजेरी लावली खरी, परंतु शपथविधी झाल्यानंतर काही काळातच महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला कोरोना विषाणूने ग्रासले. कोरोनाची पहिली, दुसरी आणि तिसरी लाट राज्याच्या अर्थ व्यवस्थेला जर्जर करत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र सरकारी निवासस्थान वर्षा येथून किंवा तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारी सह्याद्री अतिथीगृहात कामकाज बघण्याचा परिपाठ ठेवला. कोरोना महासाथीच्या लाटा ओसरता ओसरताच मुख्यमंत्र्यांना मानेच्या दुखण्याने त्रस्त केले. या आजारपणातून महिना दोन महिन्यात सावरून ते पूर्वीपेक्षा अधिक जोमाने कामाला लागतील अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली. राज्याचा कारभार एकाच कार्यालयात बसून करता येतो असे मानण्याचा बहुदा त्यांचा स्वभाव नाही. इतकी वर्षे पक्षसंघटनेचे काम मातोश्री या निवासस्थानामधूनच करण्याचे संस्कार ठाकरे यांच्यावर आहेत. मधल्या काळात गेल्या वर्षी 23 जुलै रोजी मुख्यमंत्री ठाकरे काही काळासाठी मंत्रालयात आले होते. त्यादिवशी रायगडमधील तळिये गावावर दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. मुख्यमंत्री मंत्रालयात येण्याचे टाळतात हे आजवर अनेकदा लक्षात आले आहे आणि त्याबाबत त्यांना विरोधकांच्या टीकेचे धनीही व्हावे लागले आहे. बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे दोन वर्षांनी मंत्रालयात आल्यानंतर हत्तीवरून साखर वाटा, गुढ्यातोरणे उभारा, मंत्रालयात रांगोळ्या काढा अशी खोचक टीका भारतीय जनता पक्षाच्या मुंबई शाखेतर्फे करण्यात आली. त्यात अजिबात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. अशा प्रकारची टीका मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक घेऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस तासांपैकी केवळ तीन-चार तास विश्रांती घेतात, बाकी सर्व वेळ एकही दिवस सुटी न घेता ते अविरत कामात असतात हे त्यांचे विरोधक देखील मान्य करतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंतप्रधान मोदी यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र काम केले आणि पाच वर्षांचा कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण केला. मुख्यमंत्री ठाकरे या कार्यमग्नतेच्या निकषांवर कुठल्या स्थानावर आहेत हे महाराष्ट्राचे मतदार योग्य वेळी ठरवतीलच. आता तरी मुख्यमंत्र्यांनी नियमितपणे मंत्रालयात उपस्थिती ठेवावी एवढीच राज्यातील जनेतची माफक अपेक्षा आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper