आतापर्यंत 11 लाख 40 हजार आरटीपीसीआर चाचण्या
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पहिल्या लाटेत नवी मुंबई महापालिकेने नेरूळ येथील रुग्णालयात केवळ 11 दिवसांत आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा उभारली होती. ही प्रयोगशाळा नवी मुंबईकरांना लाभदायी ठरत आहे. या प्रयोगशाळेत आतापर्यंत 11 लाख 40 हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.
सध्या ही प्रयोगशाळा कोरोना चाचण्यांसाठी वापरण्यात येत आहे, मात्र पुढील काळात या ठिकाणी इतर दुर्धर आजारांच्या चाचण्याही करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोरोना काळातील ही प्रयोगशाळा नवी मुंबईकरांसाठी वरदान ठरत आहे.
प्रतिचाचणी साधारण 2,200 रुपये इतका खर्च येतो. या प्रयोगशाळेमुळे पालिकेला प्रति चाचणी 750 रुपये खर्च आला. त्यामुळे पालिकेची प्रतिचाचणी 1,450 रुपये बचत झाली आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 13 मार्च 2020 रोजी करोनाचा पहिला रुग्ण तर 15 मार्च 2020 रोजी करोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर शहरात संसर्ग वाढला, मात्र शहरात प्रयोगशाळा नसल्याने नागिरकांचे नमुने घेऊन ते मुंबईतील जे जे तसेच कस्तुरबा रुग्णालयात पाठवले जात होते. चाचण्यांचे अहवाल येण्यास आठ दिवस लागत होते. त्यामुळे तत्काळ निदान व उपचारासाठी शहरात प्रयोगशाळेची गरज होती. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 11 दिवसांत ही प्रयोगशाळा नेरुळ येथील पालिकेच्या रुग्णालयात उभारली. 4 ऑगस्ट 2020 पासून ही प्रयोगशाळा नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. तेव्हापासून या ठिकाणी आतापर्यंत 11 लाख 40 हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता ही प्रयोगशाळा पुढील काळात इतर दुर्धर आजारांच्या चाचण्यांसाठीही वापरण्यात येणार आहे. खर्चीक असणार्या एचआयव्ही, कर्करोग यांसह संसर्गजन्य आजाराच्या चाचण्या या प्रयोगशाळेत मोफत करता येणार आहेत.
ही प्रयोगशाळा स्थानिक स्वराज्य संस्थेची अद्यावत व एमएमआर क्षेत्रातील सर्वात मोठी आहे. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत प्रयोगशाळेचा अधिक व वेगवान चाचण्यांसाठी फायदा झाला. कोरोनानंतरच्या काळात इतर दुर्धर आजारांच्या चाचण्या येथे मोफत करता येणार आहेत. ही पालिकेसाठी कायमस्वरूपी व मोठी आरोग्यसुविधा उपलब्ध झाली आहे.
-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका