Breaking News

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया शनिवारी किल्ले रायगडावर

शिवपुण्यतिथीनिमित्त करणार अभिवादन

महाड : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 342व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने किल्ले रायगडावर शनिवारी (दि. 16) शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने 16 एप्रिलला पहाटे 5 वा. श्री जगदिश्वर पूजा, सकाळी 6 वा. श्री हनुमान जन्मोत्सव, 8 वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, 9 वा. राजदरबार येथे शिवप्रतिमा पूजन, छत्रपती शिवरायांना आदरांजली, 11 वा. छत्रपतींच्या प्रतिमेची राजदरबार ते शिवसमाधी पालखीतून मिरवणूक आणि दुपारी 12.30वा. छत्रपतींना मानवंदना देऊन त्यानंतर शिवभक्तांना महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिव पुण्यस्मृती पुरस्काराने भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना गौरविण्यात येणार आहे तसेच अतिविशिष्ट सेवापदक व परमविशिष्ट सेवापदकप्राप्त व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार, नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांचे वंशज समस्त मालुसरे घराणे यांचादेखील विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
127 वर्षांपूर्वी 25 एप्रिल 1896 रोजी लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांना मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्या वेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे. असीम त्यागाच्या इतिहासाची परंपरा लाभलेला मालुसरे परिवार पुन्हा एकदा या सुवर्णक्षणाला सामोरा जात आहे.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी साखर, एरंडवाडी, सातारा जिल्ह्यातील गोडोली, फुरुस, पारगड, पारमाची, किवे, आंबेशिवथर, लव्हेरी, जामगाव मुळशी, जळगाव, धुळे, बारामती, कासुर्डी गुमा (भोर), शिवथर, निगडे (भोर), हिर्डोशी अशा महाराष्ट्रातील 70 गावांतील मालुसरे परिवारातील ज्येष्ठ मान्यवर व्यक्ती आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
छत्रपतींना आदरांजली वाहण्याकरिता शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघूजीराजे आंग्रे, सरकार्यवाहक पांडुरंग बलकवडे, कार्यवाह सुधीर थोरात आणि स्थानिक उत्सव समितीचे (महाड) अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम यांनी केले आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply