कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाच्या दोन्ही बाजूला रूळ ओलांडून जाणार्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे सातत्याने अपघात घडत असतात. रूळ ओलांडत असताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने या स्थानाकात बॅरिकेट लावण्याची मागणी पुढे येत आहे.
नेरळ रेल्वे स्थानकात प्रवासी नेहमी रूळ ओलांडत असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने अपघात होत असतात. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य रेल्वे कामगारांचे नेते प्रवीण तांडेल यांनादेखील आपला जीव गमवावा लागला होता. मागील काही महिन्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही आपले प्राण गमवले आहेत.
नेरळ रेल्वे स्थानकात उतरून नेरळ विद्या मंदिर माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी जाणारे विद्यार्थी हे थेट रूळ ओलांडून जात असतात. नेरळ पूर्व भागातील प्रवासी आणि नोकरदार तसेच विद्यार्थी हेदेखील दररोज रूळ ओलांडून ये-जा करीत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांनादेखील अपघात होत असतात. असे अपघाताचे प्रकार रोखण्यासाठी रूळ ओलांडणार्यांवर काही निर्बंध आणण्याची गरज आहे.
भिवपूरी रेल्वे स्थानकात रूळ ओलांडणार्या पादचार्यांचे बळी गेल्यानंतर मध्य रेल्वेकडून लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसे बॅरिकेट्स नेरळ आणि शेलू रेल्वे स्थानक परिसरात उभारावेत, अशी मागणी होत आहे.