नगरसेवक भुजबळ यांची महापालिकेकडे मागणी
पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेल सेक्टर 13 मधील ए टाईपमधील 100 चाळींची नळाची पाइपलाइन महापालिकेतर्फे बदलून देण्याची मागणी भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
पनवेल महापालिका हद्दीतीलनवीन पनवेल प्रभाग 17मधील सिडको वसाहतीत असलेल्या सेक्टर 12 ते 20मध्ये सिडकोने बांधलेल्या इमारतींना पाणीपुरवठा करणार्या नळांची पाइपलाइन 40 वर्षे जुन्या असल्याने जीर्ण व आतून गंज पकडल्याने जाम झाल्या आहेत. सेक्टर 13मधील ए टाइप वसाहत ही सखल भागातील बैठ्या स्वरूपाची असल्याने पावसाळ्यात त्या भागात पाणी साचते. त्यामुळे पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइन दलदलीमुळे गंजून अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. त्यामुळे या भागाला पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने रहिवाश्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
यासाठी नवीन पनवेलच्या सेक्टर 13मधील ए टाईपच्या 100 चाळींची नळांची पाइपलाइन पनवेल महापालिकेमार्फत बदलून देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे पत्र देऊन केली आहे.