टंचाईग्रस्त स्थानिकांचा शासनाकडे पाठपुरावा
कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यात आदिवासी भागात पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिकांना वणवण भटकावे लागत आहे. पाण्यासाठी सुरू असलेली वणवण लक्षात घेऊन सर्व पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्या यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, सध्या कर्जत तालुक्यात केवळ तीन गावे आणि पाच वाड्या या ठिकाणी शासनाचे टँकर पाणी पोहचवत असून तालुक्यातील अन्य पाच वाड्यांनी आपल्याला टँकर पाणी मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
कर्जत तालुक्याची भौगोलिक रचना ही डोंगर उंचवटे आणि खोलगट भाग असून या तालुक्यातील एकमेव चार प्रमुख नद्यांपैकी पेज ही नदी बारमाही वाहणारी तर एक उल्हास नदी पेजला मिळेपर्यंत कर्जत तालुक्याच्या अर्ध्या भागात कोरडी असते. आंबिवली येथे पेज नदी उल्हास नदीला मिळते आणि तेथून उल्हास नदी बारमाही वाहती होती. तर चिल्लार आणि पोश्री या दोन नद्या उन्हळ्यात कोरड्या असतात. त्यात तालुक्याचा मोठा भाग हा दुर्गम असून या भागात दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असते. तेथील पाणीटंचाई निवारण्यासाठी दरवर्षी शासनाला टँकर सुरु करावे लागतात आणि पाण्याची समस्या पाणीटंचाई काळात दूर करावी लागते. या वर्षी कर्जत तालुक्यातील 56 आदिवासी वाड्या-पाडे आणि 23 गावे पाणीटंचाईग्रस्त असून त्यांचा समावेश शासनाच्या पाणी टंचाई कृती आराखड्यात करण्यात आला आहे. तालुक्याच्या अर्ध्या भागातून वाहणार्या दोन कोरडया नद्या आणि त्या भागाचातील पाणीटंचाई यामुळे कर्जत पंचायत समिती तसेच कर्जत तहसील कार्यालय यांच्याकडे पाणी मिळावे यासाठी मोठी मागणी सुरू आहे.
यावर्षी 9मे रोजी कर्जत तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली त्यात शासनाचे 12 हजार लिटर क्षमतेचे दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत मधील मोग्रज, पिंगळस आणि नांदगाव ग्रामपंचायत मधील मोहपाडा या गावांना शासनाच्या टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. तर तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत मधील जांभुळ्वाडी, विठ्ठलवाडी, खांडस ग्रामपंचायत मधील बेलाचीवाडी आणि पाथरज ग्रामपंचायत मधील ताडवाडी, मोरेवाडी मध्ये पिण्याच्या पाण्याची सोया शासकीय टँकर करीत आहे. आता तालुक्यातील आणखी पाच आदिवासी वाड्यांनी शासनाचे टँकरची मागणी केली आहे. पाणीटंचाई भागातील पाण्याची स्थिती खालावल्यामुळे त्या त्या ग्रामपंचायतकडून टँकर सुरू करण्यात यावेत असे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पाठवण्यात आले आहेत. त्यात खांडस ग्रामपंचायत मधील वडाचीवाडी, चाफेवाडी, पादीरवाडी, मेंगाळवाडी आणि अंभेरपाडा ग्रामपंचायत मधील अंभेरपाडा यांचे प्रस्ताव शासकीय टँकरच्या मागणीसाठी पोहचले आहेत.
कर्जत तालुक्यात सर्वत्र पाण्याची टंचाईची परिस्थिती उद्भवली असल्याने शासनाने ज्या ज्या गावे आणि वाड्यांचा समावेश पाणीटंचाई कृती आराखडामध्ये केला आहे. मे महिना अर्ध्यावर आला असल्याने जी 23 गावे आणि ज्या 56 आदिवासी वाड्या यांचा समावेश पाणीटंचाई आराखड्यात आहे त्या सर्व ठिकाणी शासनाचे टँकर पाठवावे आणि तेथील पाणीटंचाई दूर करावी. -भरत शीद, अध्यक्ष कर्जत तालुका आदिवासी ठाकूर-कातकरी समाज संघटना
आमच्या कार्यालयाकडे टँकरची मागणी करणारे प्रस्ताव आले की आम्ही त्या त्या गावे-वाड्यांमध्ये जाऊन तेथील परिस्थिती पाहतो आणि टँकर सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागतो. यावर्षी टँकर सुरू करण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाने उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे शासनाचे टँकर सुरू करण्याची मागणी करणारे सर्व प्रस्ताव प्रांत अधिकारी कार्यालयाकडे पाठवले आहेत. त्यांच्या कडून कार्यादेश आल्यावर तत्काळ टँकर सुरू केले जातील. -तुकाराम साबळे, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती