आयुक्तांकडून प्रकल्पस्थळांची पाहणी

नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत विविध प्रकल्प कामे सुरू असून सदर कामांची सद्यस्थिती जाणून घेणे व त्या कामांना गती देणे यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर विविध प्रकल्प स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. बुधवारी (दि. 25) आयुक्तांनी सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील बहुमजली वाहनतळ बांधकामाची तसेच वंडर्स पार्क, सेक्टर 19 नेरूळ येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या 4 मजली बहुमजली वाहनतळात 476 चारचाकी वाहने व 121 दुचाकी अशी एकूण 597 वाहने पार्कींग करण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे.
सेक्टर 15 बेलापूर येथील भूखंड क्रमांक 39 याठिकाणी चार मजली बहुमजली वाहनतळ विकसित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत तीन स्लॅबचे काम पूर्ण झाले असून आयुक्तांनी संपूर्ण बांधकामाची पाहणी केली. वाहनतळाच्या पाहणीअंती आयुक्तांनी जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल अशा दृष्टीने नियोजनबद्ध काम करावे असे निर्देश दिले. त्याचप्रमाणे पावसाळी कालावधीत पावसाचे पाणी आत येऊ नये याची काळजी घेण्याच्या तसेच आतील भागात पुरेशा प्रमाणात नैसर्गिक प्रकाश राहील यादृष्टीने व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या.
या वाहनतळामध्ये प्रवेश करण्यासाठी कै. नागा गणा पाटील उद्यानासमोरून पूर्व दिशेने प्रवेशद्वार असून पश्चिमेच्या दिशेने वाहने बाहेर जाण्याचे प्रवेशव्दार आहे. या 4 मजली बहुमजली वाहनतळात 476 चारचाकी वाहने व 121 दुचाकी वाहने पार्कींग करण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे. यासोबतच सेक्टर 19 नेरूळ येथील वंडर्स पार्क हे नवी मुंबईकर नागरिकांप्रमाणेच नवी मुंबईला भेटी देणार्या इतर शहरांतील नागरिकांचे व पर्यटकांचेही आकर्षण केंद्र असून त्याच्या नुतनीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश
पाहणीदरम्यान आयुक्तांनी तेथील अत्याधुनिक खेळणी (राईड्स) व्यवस्थितरित्या बसविली जातील याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश अभियंत्यांना दिले. त्याचप्रमाणे या राईड्सवर खेळणार्या नागरिकांची सुरक्षा राखली जाण्याच्या दृष्टीनेही संपूर्ण खबरदारी घेतली जावी याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशित केले. वंडर्स पार्क हे अत्यंत लोकप्रिय असे मनोरंजनाचे ठिकाण असून तेथील प्रत्येक सुविधा ही त्या दर्जाची राहील याची विशेष काळजी घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper