Breaking News

बेशुद्धावस्थेतील तरुणीचे कर्जत रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या सिंहगड एक्सप्रेसमधून प्रवास करणारी एक तरुणी बेशुद्ध झाली. हे समजल्यानंतर  कर्जत स्थानकात गाडी थांबताच रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाच्या महिला कर्मचार्‍यांनी तिला सिंहगडमधून उतरवून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार करून नंतर तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

बदलापूर येथे राहणारी रोहिणी अशोक कटमनी ही तरुणी शनिवारी पुण्याहून मुंबईकडे येणार्‍या सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करीत होती. ही तरुणी कर्जत रेल्वे स्थानक येण्यापूर्वी बेशुद्ध झाली होती. ही गोष्ट प्रवाशांनी तिकीट तपासणीसांच्या निदर्शनास आणून दिली. तिकीट तपासणीसांनी लगेचच कर्जत रेल्वे स्थानक व्यवस्थापकांशी संपर्क साधला. ही गाडी कर्जत रेल्वे स्थानकात येताच रेल्वे पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी गावडे व आशा तायडे तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचारी मंजू विश्वकर्मा यांनी त्या तरुणीला गाडीतून खाली उतरवून पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉ. चवरे यांनी तातडीने उपचार सुरू केले. त्यानंतर तीन-चार  तासाने ही तरुणी शुद्धीवर आली.

रोहिणी शुद्धीवर आल्यानंतर तिच्या मोबाइलवरून तिची आई चन्नमा कटमनी आणि कुटुंबियांशी संपर्क साधला व तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तरुणीचे प्राण वाचले.  रोहिणीचे प्राण वाचविणार्‍या रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे कटमनी कुटुंबाने आभार मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply