शहीद जवानांच्या वारसांना सरकारकडून मदत
गडचिरोली ः प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटातील शहीद पोलीस जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
या घटनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत संपूर्ण चौकशी केली जाईल आणि शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गडचिरोली पोलीस दलातर्फे शहीद पोलीस जवानांना 21 बंदुकांच्या हवेत फैरी झाडून सलामी देण्यात आली. पोलीस दलातर्फे संपूर्ण शासकीय प्रथेनुसार भावपूर्ण मानवंदना देण्यात आली.
या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस महासंचालक सुबोध जैसवाल, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, नक्षलवादविरोधी अभियानाचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. संजयकुमार आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते.
गडचिरोली येथील नक्षलवादी हल्ल्यात देशाचे 15 पोलीस जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गडचिरोलीत जाऊन शहिदांना मानवंदना दिली, तसेच जवानांचे बलिदान आणि शहिदांच्या कुटुंबीयांचा आक्रोश व्यर्थ जाऊ देणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.