कर्जत : प्रतिनिधी
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमधील सखाराम तुकाराम पॉईट ते अमनलॉज दरम्यानच्या रस्त्यावर पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात चिखल झाला. मात्र नगर परिषदेने यारस्त्यावरवरील चिखल तातडीने काढून टाकल्याने नागरिकांसह पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.
पहिल्याच पावसात माथेरानमधील सखाराम तुकाराम पॉईट ते अमनलॉज परिसरातील रस्त्यांवर चिखल झाल्याने नागरिकांना तसेच पर्यटकाना चिखल तुडवत ये-जा करावी लागत होती. शनिवार, रविवार असल्याने पर्यटक मोठ्यात प्रमाणात माथेरानला आले होते.
ही बाब येथील प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्परता दाखवत नगर परिषदेच्या माध्यमातून चिखल काढून रस्ता चिखल मुक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळला असून रस्त्यावरून चालणे सुलभ झाले आहे. नागरिकांनी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांचे आभार मानले आहेत.
कर्जत : बातमीदार
नेरळ-माथेरान घाटरस्ता आणि रेल्वेमार्गाच्या बाजूला गतवर्षी पावसाळ्यात दरड कोसळली होती. त्यावेळी झाडांना अडकून राहिलेले धोकादायक दगड रेल्वे प्रशासनाकडून काढले जात आहेत.
2021 च्या अतिवृष्टीत माथेरान घाटातील वॉटर पाइप रेल्वे स्थानकाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन दरडग्रस्त भाग येथील मार्गात आडवा झाला होता. त्यामुळे येथील मार्ग बंद झाला होता. रस्त्याच्या कडेला असलेली संरक्षक भिंतही दरडीसोबत वाहून गेली होती. सार्वजनिक बांधकाम विभागने येथील रस्त्यावर आलेला दरडीचा भाग जेसीबीच्या सहाय्याने हटविला होता. मात्र काही महाकाय दगड जेसीबीनेही जागचे हलत नसल्याने ते रस्त्याच्या बाजूलाच अडकून राहिले होते.
आता पावसाळा आल्याने मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान घाटातील धोकादायक दरडी हटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार 2021 च्या अतिवृष्टीत नेरळ-माथेरान घाटातील वॉटर पाइप रेल्वे स्थानकाच्या वरच्या वळणावर झाडाला अडकलेला महाकाय दगड फोडण्याचे काम रेल्वेने सुरू केले आहे.