पुलाखालील कोंडी रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय
पनवेल : वार्ताहर
खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक विभागाकडून या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो एण्ट्रीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रिजखालून कोपरा गावाकडून येणारी वाहतूक खारघर सेक्टर 18 मध्ये जाते तसेच खारघर सेक्टर 18 कडून येणारी वाहतूक कोपरा ब्रिजखालून हिरानंदानी ब्रिजकडे तसेच पनवेलकडे जाते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामी आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक सेवा देणार्या वाहनांना त्याचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाने खारघर सेक्टर 18 डी मार्ट कडून खारघर सेक्टर 11 येथे कोपरा ब्रिजकडे खाली उतरणार्या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने या रस्त्यावर वाहनांसाठी प्रवेशबंदी केली आहे. हिरानंदानी ब्रिजपासून काही अंतरावर असलेल्या कोपरा ब्रिज पुलाखालून खारघर सेक्टर 18 मध्ये जाणार्या व खारघर सेक्टर 18 मधून कोपरा गाव व पनवेलच्या दिशेने जाणार्या वाहतुकीमुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. काही कारणांमुळे सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रीजवरील वाहतूक बंद पडल्यास खालून जाणार्या वाहतुकीत वाढ होऊन पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल यासारख्या अत्यावश्यक सेवा देणार्या वाहनांना याचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाने खारघर सेक्टर 18कडून कोपरा ब्रिजजवळ खाली उतरणार्या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक नियंत्रण विभागाने या मार्गावरून ये-जा करणार्या वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग ठेवला आहे. त्यानुसार डी-मार्ट सेक्टर 18 कडून कोपरा गाव येथे जाण्यासाठी कोपरा ब्रिजजवळील सर्व्हिस लेनवरून कळंबोली सर्कल तेथून यूटर्न घेऊन कोपरा गाव येथे जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला आहे. खारघर सेक्टर 18 येथील रहिवाशांना पुणेकडे जाताना वरील प्रमाणेच कोपरा ब्रिजजवळून खाली उतरून जाण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. तर मुंबईकडे जाणार्या वाहनचालकांसाठी बँक ऑफ इंडिया चौकातून हिरानंदानी ब्रिजखालून जाण्याचा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो एण्ट्री असल्याची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी मंगळवारी काढली. ही अधिसूचना पुढील आदेशापर्यंत अमलात राहणार आहे. ही अधिसुचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.