जिल्हाभरात लावण्यात येणार सहा लाख 41 हजार 600 झाडे
अलिबाग : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 1) अलिबागमध्ये वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी शहरातील कुंटेबाग व वरसोली समुद्रकिनारी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, कृषी विस्तार अधिकारी राजेश घरत, अलिबाग पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साळावकर, तालुका कृषी विस्तार अधिकारी प्रार्थना भोईर, वरसोली ग्रामपंचायत सरपंच प्रमिला भाटकर, विजय सावळे या वेळी उपस्थित होते. हा वृक्षलागवड कार्यक्रम संपूर्ण महिनाभर राबविण्यात येणार असून, प्रत्येक ग्रामपंचायतीत 800 झाडे असे एकूण सहा लाख 41 हजार 600 झाडे जिल्ह्यात लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तिर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे, समुद्र किनार्यावर खुल्या जागेत, दरड प्रवण क्षेत्रातील डोंगर पायथ्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी, पूरक्षेत्रातील गावामधील नदीकिनार्यालगतच्या ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत भारतीय प्रजातींची विविध झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच बांबूची बेटे निर्माण करण्याचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
महिला बचत गटांना भाजीपाला, बियाणे वाटप
जिल्हा परिषद कृषी विभाग शेषनिधीमधून परसबागेत भाजीपाला लागवड करण्यासाठी बियाणांचे मिनीकिट तयार करण्यात आले आहेत. हे मिनीकिट रायगड जिल्ह्यातील अंगणवाड्या, महिला बचत गट यांना वाटप करण्यात येणार आहेत. सुमारे 19 हजार किटचे वाटप करण्यात येणार असून, 10 हजार किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. तर उर्वरित नऊ हजार किट वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
लावलेल्या रोपांचे होणार संगोपन
रायगड जिल्हा परिषदेच्या अखात्यारीतील सर्व शाळांमधील इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक रोप व प्रत्येक शिक्षकाने किमान दोन रोपे आणि सर्व स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांना किमान दोन रोपे दत्तक घेऊन वृक्षारोपण करण्याचे आहे. त्याचप्रमाणे लावलेली रोपे कायमस्वरुपी जगविण्यासाठी त्यांच्याबोवती संरक्षक जाळी, बांबू किंवा लाकडाचे कुंपण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाउंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवक यांचा लोकसहभाग घेणेत यावा व वृक्षलागवड व संवर्धनासाठी शपथ देण्यात यावी.
– डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड