पनवेल : वार्ताहर
गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कामोठे वसाहतीमध्ये अनेक सखल भागात पाणी तुंबले होते. या वेळी नगरसेवक विकास घरत हे तत्परतेने रहिवाशांच्या मदतीला धावले. सिडकोच्या गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी गटारे तुंबली होती. वाढत्या पावसाच्या जोरामुळे काही झाडे सुद्धा पडली होती. वाढत्या पावसाच्या प्रवाहामुळे अनेक गटारात पाणी तुंबून घाण रस्तावर आली होती. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला. अशा वेळी नगरसेवक विकास घरत हे त्याच्या मदतीला धावून गेले रस्त्यावर उतरून त्यांनी वसाहतीची पाहणी केली व सर्व समस्या जाणून घेतल्या पाण्याचा प्रभाव वाढल्यास त्याला पर्याय म्हणून आवश्यक ती उपाययोजना केली. या वेळी विकास घरत यांच्यासोबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नाना मुकादम आणि त्यांच्या सहकार्यांनी सुद्धा धाव घेऊन अनेकांना मदत केली, तसेच सिडको व महानगरपालिका अधिकारी वर्गाला तशी माहिती देत आवश्यक त्या सूचना केल्या. या वेळी विकास घरत यांनी भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा देत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
पनवेल परिसरात मुसळधार पाऊस
पनवेल : गेल्या 24 तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल परिसरात चांगले झोडपून काढले आहे. पावसाळी वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता या पावसाचा आनंद बच्चे कंपनीने भिजून घेतला. पनवेल शहरासह कामोठे, पळस्पे, कळंबोली, खारघर, करंजाडे, खांदा वसाहत आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. साधारणपणे आतापर्यंत 172.20 मि.मि सरासरी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. या पावसाळा सामोरे जाण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत व तहसीलदार कार्यालय यांच्यातर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्षची स्थापना करण्यात आली असून 022-27452399, भ्रमणध्वनी – 8369899902 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबईलाही पावसाने झोडपले
नवी मुंबई : राज्याच्या हवामान खात्याने पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा खरा ठरताना दिसत आहे. रविवारपासून सलग तीन दिवस पाऊस कोसळत आहे. नवी मुंबईतदेखील पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. या कोसळधारेने नवी मुंबईकर मात्र चिंब झालेले पाहायला मिळाले. अनेकांची त्रेधा उडालेली पाहण्यास मिळाली. नवी मुंबईची रचना एकाबाजूला खाडी, त्यापासून तीन की. मी वर डोंगररांगा अशी आहे. त्यामुळे एकाचवेळी मुसळधार कोसळत असलेला पाऊस, डोंगरावरून शहरात वाहून येत असलेले पाणी त्यामुळे शहरात सखल ठिकाणी पाणी साठले होते, मात्र काही मिनिटांत साठलेले पाणी वाहून जाताना दिसले. मध्यरात्रीपासून क्षणभर देखील उसंत न घेतलेल्या पावसाने नवी मुंबईला झोडपून काढले. नवी मुंबईतील शिरवणे, सानपाडा, जुईनगर व नेरूळ रेल्वे उड्डाणपूलाखाली गुडघाभर पाणी साठले होते. शहरात काही ठिकाणी फांद्या तुटण्याच्या व झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. आपत्कालीन, अग्निशमन, उद्यान व घनकचरा विभाग मात्र याबाबत सतर्क होता. या फांद्या तातडीने उचलण्यात येऊन रस्ते व पद्पथ मोकळे करण्यात आले.
कळंबोलीत पाण्याचा निचरा होण्यासाठी भाजप पदाधिकार्यांचा पाठपुरावा
कळंबोली : पावसाने जोरदार हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे कळंबोली परिसरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहिले. यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याची माहिती भाजप कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील यांना मिळताच त्यांनी घरचा दुखावटा विसरून लगेच महापालिका अधिकारी व कर्मचार्यांना पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप लावणायचे सुचना केली. पंप चालू करून घेण्याच्या कामी रविनाथ पाटील हे तेथे स्वत: उभे होते. त्यानंतर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली. या वेळी कळंबोली भाजप सरचिटणीस दिलीप बिष्ट, व्यापारी संघ अध्यक्ष कमल कोठारी, उत्तर भारतीय अध्यक्ष केशव यादव आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper