पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभागातर्फे महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गामुळे एक पालक किंवा दोन पालक गमावलेल्या 21 वर्षाखालील 128 बालकांना प्रत्येकी 50 हजारांचे अर्थसहाय्य वाटप मंगळवारी (दि. 5) करण्यात आले.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, महिला बालकल्याण समितीच्या सदस्य, प्रभाग समिती सभापती व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. कोरोना काळात अनेक बालकांच्या पालकांचा अकस्मात मृत्यू झाला. 21 वर्षांखालील जी मुले अनाथ झाली अशा अविवाहित मुला-मुलींना आर्थिक मदत देऊन त्यांच्या दु:खाचा भार हलका करावा या उद्देशाने महापालिकेने महिला बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर यांच्या काळात महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने भरीव रकमेची तरतूद केली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण 128 बालकांना मंगळवारी मुदत ठेवीच्या स्वरूपात अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना त्याच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार मदतीचे धनादेश देण्यात येणार आहेत. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी महापालिका ही उपस्थित सर्वांच्या दु:खामध्ये सहभागी असून त्यांचे दु:ख हलके करण्याच्या दृष्टीने ही मदत केली असल्याचे सांगितले, तर आयुक्त गणेश देशमुख म्हणाले की, ही मदत बालकांच्या भविष्यासाठी केलेली एक तरतूद आहे. महिला बालकल्याण समितीने कोरेाना काळात पालक गमावलेल्यांना आर्थिक मदत देण्याची संकल्पना मांडली. या मदतीच्या रूपातून महापालिका या बालकांना नवी उमेद देत आहोत.
महापालिका क्षेत्रातील कोरोना काळात एक किंवा दोन पालक गमावलेल्या ज्या बालकांना आर्थिक मदत मिळालेली नाही त्यांनी पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय यांनी केले आहे.
या वेळी पनवेल महापालिका क्षेत्रातील एक किंवा दोन पालक गमावलेले मुले-मुली, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी हजर होते.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …