Breaking News

18 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस मोफत मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने 18 ते 59 वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार असून या 75 दिवसांच्या मोहिमेंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत.
गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लसीच्या दुसर्‍या डोसमधील अंतर नऊ महिन्यांवरून सहा महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात मोफत लसीकरण मोहीम मर्यादित कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात 18-59 वयोगटातील 77 कोटी लोकांना प्रतिबंधात्मक डोस द्यायचा आहे. त्यापैकी एक टक्क्यांहून कमी लोकांना आतापर्यंत खबरदारीचा डोस देण्यात आला आहे. तथापि, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील अंदाजे 160 दशलक्ष पात्र लोकसंख्येपैकी सुमारे 26 टक्के तसेच आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस मिळाला आहे.
ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी ते जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करू शकतात.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply