अनेक घरांतील सामानाचे नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी
दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे गुरुवारी (दि. 14) अलिबाग तालुक्यातील धेरंड गावतील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले.
गुरुवारी समुद्राला मोठी भरती आली. खरबंदिस्ती फुटली असल्यामुळे उधाणाचे पाणी धेरंड गावात शिरू लागले. त्यामुळे गावकर्यांची तारांबळ उडाली. उधाणाचे पाणी काही घरांमध्ये घुसले. या घरांमधील लोकांनी रात्र जागून काढली. शुक्रवार दुपारपर्यंत गावात पाणी होते. घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत लोक घराबाहेर होते. धेरंड गावात पाणी शिरले, हे माहीत असतानादेखील शासकिय अधिकारी येथे वेळेत पोहचले नाहीत.
वीज प्रकल्पासाठी धेरंड गावातील काही शेतकर्यांच्या जमिनी बारा वर्षापूर्वी संपादित करण्यात आल्या. ती जमीन एमआयडीसीकडे वर्ग केली. येथील खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे धेरंड, मोठे शहापूर, धाकटे शहापूर या तीन गावांत समुद्राच्या भरतीचे पाणी घुसून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापुढे जीवित हानी होण्याची शक्यता आहे. शासनाने याची दखल घेऊन खारबंदिस्तीची कामे करावीत, अशी मागणी भाजप खारेपाट विभागीय अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी गोविंद कृष्णा पाटील यांनी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper