Breaking News

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण घटनापीठाकडे ; 25 ऑगस्ट सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण पाच सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली असून यावर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे या मुद्द्यावरील मंगळवारची (दि. 23) नियोजित सुनावणीदेखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सत्तासंघर्षासंदर्भातील पाच याचिकांचा समावेश सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या त्रिसदस्यीय पीठाच्या मंगळवारच्या दैनंदिन व पुरवणी कार्यसूचीत सोमवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीबाबतही रात्री उशिरापर्यंत अनिश्चितता होती, मात्र मंगळवारी सकाळी या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी हा विषय कार्यसूचीमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली गेली. त्यानुसार दुपारी साडेबाराच्या सुमारास यावर सुनावणी घेण्यात आली.
सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार आता या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठासमोर घेतली जाणार आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी अर्थात 48 तासांच्या आत ही सुनावणी होईल. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असणार्‍या धनुष्यबाणासंदर्भात निवडणूक आयोगासमोर नियोजित असणारी सुनावणीदेखील दोन दिवसांनी पुढे ढकलली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर येत्या 25 ऑगस्ट रोजी सुनावणी आणि त्यानंतर निर्णय येण्याची शक्यता आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply