खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावर कर्जत-लोणावळा स्थानकादरम्यान असणार्या बोरघाटातील मंकीहील पॉईंटजवळ मंगळवारी (दि. 23) पहाटे दरड कोसळली. या घटनेत रेल्वे इंजिनचे काही प्रमाणात नुकसान झाले असून तीन तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती.
पावसाने जोर धरला असल्याने मागील दोन आठवड्यापासून बोरघाटात दरड कोसळण्याच्या छोट्यामोठ्या घटना घडत आहेत. मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बोरघाटातील मंकीहील पॉईंटजवळ दरड कोसळून रेल्वे मार्गामध्ये मोठंमोठे दगड आणि माती आली. त्यामुळे मंगळवारी पहाटेपासून कर्जत-लोणावळा मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. जेसीबी मशीनच्या सहाय्याने रेल्वे कर्मचार्यांनी युद्धपातळीवर रेल्वे रुळावरील मलबा बाजूला केल्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली.