Breaking News

माणगावात आवळी भोजनाची अनोखी परंपरा

माणगाव ः प्रतिनिधी

भारतीय संस्कृतीत अनेक प्रथा परंपरा रूढ आहेत. कार्तिक महिन्यात दीपावलीनंतर कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमा या काळात आवळी भोजनाची खास परंपरा रूढ असून या परंपरेचे आजही ग्रामीण शहरी भागात पालन केले जाते. सध्या या प्रथेचा कालावधी सुरू असून अनेक ठिकाणी आवळी भोजनाचा आनंद घेतला जात आहे. या प्रथेनुसार कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमेच्या कालावधीत आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. आरती करून झाडाला नैवेद्य दाखवितात व सर्वजण एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतात. कुटुंबातील सर्व नातेवाईक, मित्रपरिवार या खास भोजनासाठी उपस्थित असतात. अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारची ही परंपरा आधुनिक काळातही पाळली जाते. यानिमित्ताने आप्त परिवार एकत्रित भोजनाचा व सामूहिक आनंदाचा अनुभव घेताना दिसत आहेत. कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाला बहर येतो. आवळ्याच्या झाडाची पूजा झाल्यानंतरच आवळा खायला सुरुवात करण्याची पद्धती आहे. आयुर्वेदात आवळ्याच्या झाडाला फार मोठे महत्त्वाचे स्थान आहे. ते एक उत्तम रसायन असून त्याचा त्रिफळा चुर्णात समावेश होतो. धार्मिकदृष्ट्याही या झाडाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. आवळी पूजनात आवळ्याच्या झाडाखाली श्री विष्णूची पूजा केली जाते. झाडाच्या बाजूस तुपाचे दिवे लावतात. आवळ्यावर वात लावून झाडाची ओवाळणी केली जाते. तुळशीच्या लग्नातही आवळ्याला महत्त्वाचे स्थान आहे. आवळ्यातील औषधी गुणधर्मामुळे त्याचे महत्व कळावे, यासाठी त्याचे पूजन व सहभोजनाची परंपरा आहे, असे माणगाव येथील मंगल मेहता यांनी सांगितले.

आवळ्याचे आयुर्वेदातील महत्त्वही अधोरेखित

आवळ्याला अमृतफळ असेही म्हणतात. या झाडाची सावली शांत व आल्हाददायक असते. आवळ्याचा मोरावळा तयार करतात. केस धुण्यासाठी, बुद्धी, मेधा, तारुण्यासाठी तसेच पाचक रस तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. आवळ्यात क जीवनसत्त्व भरपूर असते. त्यामुळे ते आरोग्यदायी फळ आहे. हे फळ आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेली व वनस्पती आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply