अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा पुरविता येतील, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी जिल्हा परिषदेने विविध ऑनलाइन सुविधा सुरू केल्या असून, त्यासोबतच नागरिकांना एखादी योजना राबविताना किंवा एखादी समस्या दिसल्यास ती मांडण्यासाठी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व ऑनलाइन प्रणाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त रायगड जिल्हा परिषदेचे कामकाज गतिमान होण्यासाठी तसेच नागरिकांना घरबसल्या सुविधा पुरविण्यासाठी विविध ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहेत. जिप.च्या माध्यमातून ऑनलाइन घरपट्टी भरणा प्रणाली, अमृतग्राम डिजिटल कर प्रणाली, कंत्राटदार ई-नोंदणी, ई-कामवाटप नोंदणी प्रणाली, अमृतग्राम कार्यक्रम नोंदणी प्रणाली, अमृत नावीन्यपूर्ण संकल्पना प्रणाली, निवृत्ती वेतनधारकांसाठी अमृत प्रणाली अशा विविध ऑनलाइन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.या ऑनलाईन प्रणालींमुळे कामकाजात सुसूत्रता येण्यासोबत कामकाज गतिमान झाले आहे. याचबरोबर नागरिकांना एका क्लिकवर अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यांना आपली घरपट्टी तसेच इतर कर ऑनलाईन पद्धतीने भरणे सुलभ झाले आहे. तसेच कंत्राटदार ई-प्रणालीमुळे कुठलाही कंत्राटदार आपली नोंदणी ऑनलाइन करू शकतो, यामुळे जिल्ह्याबाहेरील ठेकेदार नोंदणी करू लागले आहेत. कामवाटप प्रणालीमुळे कुठे कोणते काम सुरू आहे, याची माहिती सहज खुली झाली आहे. तसेच इतर प्रणालींमुळे नागरिकांना आपल्या भागातील समस्या, तसेच एखादी योजना राबविण्यासाठी आपल्या कल्पनेतील नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविणे सोयीचे झाले आहे.
ऑनलाइन प्रणालीने प्रशासकीय कामकाज गतिमान होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ घेणे सोयीचे ठरणार आहे. यामुळे त्यांच्या वेळेची बचत होईल. ग्रामपंचायतींची करवसुली वाढण्यास मदत होईल. नागरिकांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना प्रशासनाकडे मांडण्याची ऑनलाइन सोयही आहे. नागरिकांनी या सर्व सेवांचा लाभ घ्यावा.
-डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद