ठाकरे गटाला पनवेलमध्ये धक्का
पनवेल : वार्ताहर
पनवेल येथील माजी नगरसेवक रमेश गुडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पनवेलमध्ये हा ठाकरे गटाला धक्का आहे.
पनवेल अर्बन बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत उमेदवारी निश्चित करण्यावरून रमेश गुडेकर आणि शिवसेना ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद झाल्याचे समजते. याबाबत एक पत्रक जारी करून गुडेकर यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा सल्लागार पदावर असूनही जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी त्यांची हकालपट्टी केली. यानंतर शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी लागलीच गुडेकर यांची भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत दिलजमाई केली.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंपासून काम केलेले रायगड जिल्ह्यातील जुने शिलेदार म्हणून रमेश गुडेकर यांची ओळख आहे. पाच वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. शाखाप्रमुख, शहरप्रमुखपासून ते थेट वरिष्ठ जिल्हा सल्लागारापर्यंत शिवसेनेत त्यांना जबाबदार्या देण्यात आल्या. खरेतर त्यांनी ’मी बाळासाहेबांचा, माँसाहेबांचा, पण नाही मातोश्रीचा’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात असल्याचे काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट केले होते. अखेर गुडेकर यांनी शनिवारी (दि. 3) अधिकृतरित्या प्रथमेश सोमण यांच्या मध्यस्थीने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशावेळी सोमण यांच्यासोबत पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनवणे, संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यापुढेही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार म्हणूनच काम करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे गुडेकर यांनी सांगितले.