Breaking News

सहलीच्या बसला बोरघाटात अपघात; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 46 जण जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी मुंबईहून लोणावळा येथे आलेली बस परतीच्या प्रवासात बोरघाटातील मॅजिक पॉईंटजवळ रविवारी (दि. 11) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उलटली. या अपघातात बसमधील सर्व 48 विद्यार्थी जखमी झाले. यातील दोन विद्यार्थ्यांचा उपचाराच्यादरम्यान मृत्यू झाला, तर काहींची प्रकृती गंभीर आहे.
मुंबई चेंबूर येथील मयांक कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल एनबीएस टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल कंपनीच्या बस (एमएच 04-जीपी 2204)मधून लोणावळा येथे आली. बसमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेले 48 विद्यार्थी व दोन शिक्षक होते. परतीच्या प्रवासात बोरघाटातील मॅजिक पॉईंटजवळ रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात बसमधील सर्व 48 विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या किंचाळ्यांनी परिसर हादरला.
अपघाताचे वृत्त समजताच खोपोलीतील शासकीय यंत्रणांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व जखमींना प्रथम खोपोली नगर परिषद रुग्णालयात दाखल केले. 48 विद्यार्थ्यांपैकी 11 जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी राज म्हात्रे (वय 15, रा. चेंबूर) आणि हितिका खन्ना (वय 15, रा. चेंबूर) या दोन विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, खोपोली नगर परिषद रुग्णालयात प्रथमोपचारानंतर 41 विद्यार्थ्यांना पनवेल, कामोठे येथे हलविण्यात आले. पनवेल येथील अष्टविनायक रुग्णालयात दोन जखमी विद्यार्थी दाखल आहेत, तर खोपोलीतील जाखोटीया रुग्णालयात दोन विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांवर किरकोळ उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
या अपघातप्रकरणी बसचालक शैलू कैलास ठाकूर (मूळ रा. झारखंड) याच्याविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply