नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
वर्ष संपायला काही दिवस उरले असतानाच रविवारी (दि. 25) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. ’मन की बात’ मध्ये त्यांनी वाढत्या कोरोनासह अनेक विषयांवर जनतेला मार्गदर्शन केले. पंतप्रधान म्हणाले, 2022 खरोखरच अनेक अर्थांनी खूप प्रेरणादायी आणि अद्भुत आहे. यावर्षी भारताने आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण केली आणि देशाला नवी गती मिळाली. सर्व देशवासियांनी एकापेक्षा एक सरस गोष्टी केल्या. आता नवीन वर्षातही देश आणखी यशाची नवनवीन शिखरे गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मन की बातच्या शेवटच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना अनेक मुद्दांवर मार्गदर्शन केले. भाषणामध्ये सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरत्या वर्षातील अनेक आठवणी सांगितल्या तसेच अमृत महोत्सवी वर्ष साजरे केल्याने हे वर्ष खास होते असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादनही केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शिक्षण, परराष्ट्रसंबंधांसह अनेक क्षेत्रामध्ये देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, अशा शब्दात त्यांनी वाजपेयींच्या राजकारणाचे कौतुक केले. देशावर पुन्हा कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना सावध करताना मास्क वापरण्याच्या, सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या. यावर्षी भारताला जी 20 गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही मिळाली आहे. मागच्या वेळीही मी याबद्दल सविस्तर चर्चा केली होती, तसेच 2023मध्ये आपल्याला जी 20चा उत्साह नव्या उंचीवर घेऊन जायचा आहे, असे आवाहन केले. 26 डिसेंबर हा ’वीर बाल दिवस’ आहे आणि त्यानिमित्ताने मला दिल्लीत साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याला समर्पित कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिळेल. देश, साहिबजादे आणि माता गुजरी यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील, असेही ते आपल्या भाषणात म्हणाले. गेल्या काही वर्षात आपण वैद्यकीय क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे.याच जोरावर आपण पोलिओ आणि चेचक सारख्या रोगांना देशातून हद्दपार केले आहे असे म्हणत आता काला आजारही नष्ट होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हे वर्ष अत्यंत महत्वाचे होते कारण आपण स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले तसेच या वर्षी आपण प्रगत आणि सर्वाधिक वेगाने जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मानही मिळवला. आता आपण नववर्षात म्हणजे 2023मध्ये भेटू. तुम्हा सर्वांना नवर्षाच्या शुभेच्छा. नववर्षात आपण सर्वांनी नवे संकल्प करुया आणि त्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया, नवर्षात देश आणखी यशाची नवनवीन शिखरे गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.