कर्जत : प्रतिनिधी
माथेरानच्या पर्यटनामध्ये ऐतिहासिक निर्णय ठरलेल्या ई – रिक्षा या सध्या माथेरानमध्ये सुरू आहे, परंतु या रिक्षावर येथील एका अवघड वळणावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई रिक्षाचालक संजय हरिभाऊ बांगरे यांची रिक्षा (आठ एम एच 46 बीपी 3606) या ई रिक्षा मधून दस्तुरी नाका इथून माथेरानच्या दिशेने पॅसेंजर घेऊन येत असताना कोणी अज्ञात व्यक्तीने आरटूआरफोर या रिक्षातील चालक आणि प्रवास करणार्या प्रवाशांच्या व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल अशा बेदरकारपणे व हयगयीने ई-रिक्षावर दगड मारण्याची कृती केली होती. या दगडफेकीत सुदैवाने रिक्षाचालक थोडक्यात बचावला, परंतु अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये याकरिता या रिक्षा चालविणार्या कंपनीचे व्यवस्थापक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाची अधिक तपास माथेरान पोलीस ठाण्याचे एपीआय शेखर लव्हे तसेच ठाणे अंमलदार महेंद्र राठोड हे करीत आहेत.
दोन वेळा असे दगडफेकीचे प्रकार घडलेले आहेत. त्या अज्ञात व्यक्तींचा हाच उद्देश असावा की ई रिक्षाच्या चालकांना त्रास दिल्यास आणि जखमी केल्यास हे चालक काम करणार नाहीत.यापुढे अशा दगडफेकीच्या घटना घडू नयेत.
-हरिश्चंद्र पारधी, ई-रिक्षा चालक
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सध्या प्रायोगिक तत्त्वावर ई – रिक्षा सुरू आहेत. या सेवेमुळे सर्वांना लाभ होत आहे, परंतु काही अज्ञात व्यक्तींनी या रिक्षावर केलेल्या दगडफेकीचा प्रकार अत्यंत निंदनीय असून आम्ही अशा कृतीचा जाहीर निषेध करतो. पोलीस प्रशासनाने लवकरच अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.
-शकील पटेल, अध्यक्ष श्रमिक हातरीक्षा संघटना माथेरान