Breaking News

आयोगाच्या संयमाची परीक्षा

संपूर्ण देशभरात काही तुरळक प्रकार वगळता निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत. अखेरच्या टप्प्यातील हा हिंसाचार टाळण्याची खबरदारी खरे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घ्यायला हवी होती. परंतु त्यांनी सुरूवातीपासूनच अडवणुकीचे धोरण अनुसरले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, योगी आदित्यनाथ आदींच्या सभांना त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला. भाजप नेत्यांची हेलिकॉप्टर्स उतरू न देणे यांसारखे प्रकार त्यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला अखेर प्रचारमुदतीत कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणे भाग पडले. देशातील निवडणूक इतिहासात प्रथमच राज्यघटनेच्या कलम 324चा वापर करण्यात आला आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात देशभरातील 59 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यांचा प्रचार नेहमीप्रमाणे शुक्रवारी 5 वाजता संपेल. परंतु पश्चिम बंगालमधील ज्या 9 मतदारसंघांमध्ये या शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे, त्या सर्व मतदारसंघांतील प्रचार मात्र गुरुवारी संपणार आहे. मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकात्यातील रोड शो दरम्यान भाजप व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संघर्ष उफाळला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हिंसाचार पहायला मिळायला. समाजसुधारणा, साहित्य आणि संस्कृती यांसाठी ख्यात असलेल्या पश्चिम बंगाल राज्यात अशा तर्‍हेचा भडका पहायला मिळावा हे आश्चर्यकारक आहे. एकीकडे ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगाच्या संयमाची परीक्षा पाहिली तर दुसरीकडे आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेच्या हाताळणीबद्दल मूलभूत प्रश्नही उपस्थित केले. आता अखेर आयोगाने कलम 324चा वापर करण्याचा बडगा उगारल्यावर देखील ‘ही तर आयोगाची पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट आहे’  असा उलटा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. वास्तवत: जिथे जिथे काही गैरप्रकार समोर आले तिथे तिथे निवडणूक आयोगाने नि:पक्षपातीपणाने कारवाई केली. उदाहरणार्थ हरयाणातील फरिदाबाद येथे एका पोलिंग एजंटने थेट मतदान करताना महिला मतदारांवर दबाव आणल्याचा प्रकार व्हायरल व्हिडिओतून समोर आल्यावर आयोगाने तिथे फेरनिवडणुकीची घोषणा केली. तंत्रज्ञानामुळे यंदाच्या निवडणुका सुरक्षित आणि जास्तीत जास्त नि:पक्षपाती करण्यात यश आले आहे. केरळमध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या शोधातून बोगस मतदानाचे प्रकरण उघडकीस आले. आजच्या घडीला मतदानकेंद्रांचे ‘लाइव्ह वेबकास्ट’ करण्याचे प्रमाण मर्यादित आहे. फरिदाबादसारख्या घटना पाहता जितक्या लवकर असे थेट प्रक्षेपण सुरू करता येईल तेवढे बरे, हे स्पष्ट होते. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अबाधित राहायला त्यामुळे मोठी मदत होईल. काळाच्या ओघात तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत होत चालले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तसेच फेशियल रेकगनिशन (तंत्रज्ञानाच्या साह्याने चेहरा ओळखणे) यांसारख्या तंत्रज्ञानामुळे गैरप्रकारांना अटकाव करण्यास मोठी मदत होणार आहे.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply