अपूरे कर्मचारी व सुविधांच्या अभावाने नागरिकांची ग़ैरसोय
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील सबपोस्ट ऑफिसमध्ये (उप डाकघर) कर्मचार्यांची वानवा आहे. येथे एक पोस्टमास्तर व चार क्लार्क या पाच जागा रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. तसेच लवकर काम न झाल्याने नागरिकांना एका कामासाठीसुद्धा कित्येक तास खोळंबावे लागते. शिवाय अपुर्या सोयी सुविधांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अपुरे कर्मचार्यांमुळे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सेव्हिंग खाती व विविध योजनांचा लाभ मिळण्यास दिरंगाई होत असल्याने नागरिक व खातेदार संतापले आहेत.
पाली सबपोस्ट ऑफिसमधील आधार कार्ड नोंदणी केंद्र अपुर्या सेटअपमुळे गेली अनेक महिने बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांना आधार कार्ड नोंदणी अपडेट करता येत नाही. तसेच मागील दीड वर्षांपासून येथील जनरेटर बंद आहे. परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पोस्ट ऑफिसमधील सर्व कामे ठप्प होत आहेत. पावसाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे येथील जनरेटर लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी अॅड. नोवेल चिंचोलकर यांनी केली आहे.
रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. अनेक कामांना विलंब होतो. लवकर काम न झाल्याने नागरिकांना एका कामासाठीसुद्धा कित्येक तास खोळंबावे लागते. मनिऑर्डर, स्पीडपोस्ट, पार्सल देणे किंवा घेणे, पोस्ट तिकीट, लिफाफा, पोस्टकार्ड घेणे, पैसे जमा करणे अशा छोट्या कामांसाठीदेखील खूप वेळ जातो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, बचत खाते व विविध योजनांचा लाभ मिळतांनादेखील दिरंगाई होते.
पाली पोस्ट ऑफिसमध्ये अपुर्या सोयीसुविधा असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शासनाने याची दखल घेऊन सोयीसुविधा पुरवाव्यात. तसेच रिक्त जागादेखील भरण्यात याव्यात.
-अॅड. नोवेल चिंचोलकर, पाली
पाली उपडाकघर कार्यालयातील आधार कार्ड नोंदणी केंद्रात अपुर्या वस्तूं अभावी ते बंद आहे. त्या संदर्भात व रिक्त पदांसंदर्भात अनेक वेळा जिल्हा पोस्ट कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. मात्र अजूनही त्याची दखल घेतली गेली नाही. कार्यालयातील बंद अवस्थेत असलेला जनरेटर लवकरच सुरू करण्यात येईल.
-सरोजा रुमडे, पोस्ट मास्तर, पाली