Breaking News

टंचाईग्रस्त झुगरेवाडीत मुबलक पाणी

311 फूट खोल खोदले बोअरवेल; कर्जत अपडेट ग्रुपची सामाजिक बांधिलकी

कर्जत : बातमीदार

तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून, ती दूर व्हावी यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काही सामाजिक संस्थाही पुढे येत आहेत. कर्जत अपडेट या राजकारण विरहित सामाजिक काम करणार्‍या सोशल मीडिया ग्रुपने पुढाकार घेऊन टंचाईग्रस्त झुगरेवाडीला बोअरवेल खोदून आणि वीज पंप टाकून पिण्याचे पाण्याची कायमस्वरूपी सोय करून दिली. दरम्यान, झुगरेवाडी ग्रामस्थ या बोअरवेलसाठी लावलेल्या वीज मीटरचे बिल वर्गणी काढून भरणार आहेत.

झुगरेवाडी या 300हुन अधिक घरे असलेल्या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. झुगरेवाडीला पिण्याचे पाणी द्या, अशी मागणी नाथा झुगरे या ग्रामस्थाने सामाजिक कार्यकर्ते भरत भगत यांच्याकडे केली. भगत यांनी ही बाब व्हाट्सअप ग्रुपवर चर्चेस आणली. कर्जत अपडेटनेदेखील तात्काळ पुढाकार घेऊन जमिनीमध्ये पाणी कुठे आहे, याचा शोध घेतला. त्यानंतर कर्जत अपडेटकडून ग्रुप अ‍ॅडमिन यांनी जागा मालक गणपत झुगरे यांना बोअरवेल खोदण्यासाठी आपली काही जमीन देण्याची विनंती केली. त्यांनीही बोअरवेलसाठी जागा देण्याची तयारी दर्शविली. 13 मे रोजी त्या ठिकाणी 110 फुटावर बोअरवेलला पाणी लागले. मात्र  भरत भगत यांनी ती बोअर तब्बल 311 फूट खाली नेली.

भरपूर पाणी लागलेल्या बोअरवेलसाठी वीज मीटर घेऊन आणि वीज पंप लावून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी कर्जत अपडेट या व्हाट्सअँप ग्रुपचे सदस्य भरत भगत, किशोर शितोळे, मिलिंद विरले, संदीप म्हसकर, किशोर गायकवाड, किसन शिंदे, दादा पादिर, दिनेश कालेकर, परेश भगत, विलास शेळके, गणेश पवार आणि श्रीकांत हाबळे बुधवारी (दि. 15) झुगरेवाडीत पोचले. त्यांचे दामू पारधी, चाहु झुगरे, हनुमान झुगरे, हेमा पारधी, परशुराम केवारी, भगवान हुमणे, यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले. भरत भगत यांनी बोअरवेलची पूजाअर्चा केली तर किशोर शितोळे यांनी श्रीफळ वाढविल्यानंतर बोअरवेलचे पाणी सुरू करण्यात आले. इंदूबाई झुगरे, सुमन झुगरे, पालिबाई झुगरे, हिराबाई पारधी, मणिबाई झुगरे आणि पिलाबाई पारधी या महिलांनी पहिल्यांदा हांडे भरून पाणी आपल्या घरी नेले. आपल्यासाठी खास खोदलेली बोअरवेल आणि त्यांचे पाणी भरताना अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आले.

आमच्या झुगरेवाडीत गावातील महिला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीवर जाऊन पाणी भरायच्या. आता गावात बोअरवेलचे पाणी उपलब्ध झाल्याने त्यांचे कष्ट वाचणार आहेत.

-पालिबाई झुगरे, ग्रामस्थ महिला, झुगरेवाडी, ता. कर्जत

कर्जत अपडेट ग्रुपबरोबर आमचे कोणतेही नाते नाही. तरीदेखील बोअरवेलसाठी लागलेला किमान 90 हजार रुपये एवढा मोठा खर्च या ग्रुपच्या सदस्यांनी वर्गणी काढून केला. आता आम्हाला पाणी विकत घ्यावे लागणार नाही आणि दररोज घराजवळ पाणी मिळेल.

-नाथा झुगरे, ग्रामस्थ, झुगरेवाडी, ता. कर्जत

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply