Breaking News

रोह्यात विनापरवाना शेकडो झाडांची कत्तल

साग, जांभूळ, खैर, आंबा, ऐन, शिरसंची तोड; तक्रार दाखल होताच वनविभागाकडून थातूरमातूर कारवाई

धाटाव : प्रतिनिधी
रोहा येथील सानेगाव जंगल भागातील खाजगी जागेत बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. वृक्षतोड करण्याचा परवाना न घेता येथील शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली. याप्रकरणी तक्रार दाखल झाली परंतु वनविभाग प्रशासन सुस्त राहिले.तक्रारदाराने सातत्याने पाठपुरावा करीत कारवाईसाठी तगादा लावल्याने वन खात्याकडून अखेर नाममात्र कारवाई झाली. दोघांविरोधात गुन्हा दाखल करीत त्याच्याकडून केवळ आठ हजार रुपये दंड जमा करण्यात आला आहे. रोहा तालुक्यातील सानेगाव येथील घनदाट जगंल भागात काही मालकीच्या 32 हेक्टर जागेमध्ये झाडांची तोड करण्याचा ठेका देण्यात आला. ठेकेदारांनी तोडकाम करताना लगत असलेल्या अन्य मालकीच्या जागेत देखील विना परवाना झाडांची तोड केली. तोडकाम करण्यापूर्वी हद्द कायम न करता तसेच मालकांची परवानगी न घेता राजरोसपणे शेकडो झाडांची कत्तल केली. खाजगी मालकीच्या जागेतील साग, जाभूळ, खैर, आंबा, ऐन, शिरस इत्यादी झाडांची बेसुमार तोड करण्यात आली. सानेगाव येथील हा जंगल भाग निर्मनुष्य असल्यामुळे ठेकेदाराने याभागात अक्षरशः हैदोस घातले. याप्रकरणी जमीन मालक अमलकांत मोरे यांनी लेखी तक्रार दिली. त्यानंतरही वनविभाग प्रशासन ढिम्म राहिले. तक्रारदार यांनी सातत्याने पाठपुरावा करीत कारवाईसाठी तगादा लावल्याने अखेर वन खात्याने दोघांविरोधात थातूरमातुर कारवाई केली आहे. मागील 2 वर्षात या तोडकामाच्या माध्यमातून लाखो रुपये किंमतीच्या झाडांची तस्करी करण्यात आली आहे. वृक्षतोडीच्या कामाचा परवाना घेत असताना सातबारा उतार्‍यावरील असलेले काही जमीन मालक मयत असताना देखील वारसनोंदी न करता केवळ साध्या कागदावर सह्या घेऊन संबधित ठेकेदाराला तोडकामाची परवानगी देण्यात आली आहे, असे आरोप तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते अंमलकांत मोरे यांनी केले आहेत.

वन खात्याकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आलेला आहे. याप्रकरणी कैलाश पांडुरंग जंगम व सतीश काशिनाथ म्हात्रे या विनापरवाना तोडकाम करणार्‍या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून आठ हजार रुपये दंड जमा करण्यात आला आहे.
– मनोज वाघमारे, वन परीक्षेत्र अधिकारी, रोहा

सततची होणारी वृक्षतोड आणि लागणारे वणवे याबाबत वनविभागाची भूमिका ही संशय निर्माण करणारी आहे. याबाबत अनेक तक्रारी येत असल्याने याविषयी लवकरच पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन संबंधितांवर तातडीने सक्त कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.
– नितिन परब, रोहा सिटीझन फोरम

वन खात्याच्या मर्जीनेच येथे शेकडो झाडांची तोड आणि तस्करी होत आहे, त्यामुळे तक्रार दिल्यानंतरही दिरंगाईने नाममात्र कारवाई करण्यात आली. या कारवाईने आपण समाधानी नसून वनमंत्री सुधीर मुंगटीवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत.
– अंमलकांत मोरे, जमीन मालक

फोटो : झाडांची कत्तल

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply