Breaking News

स्वयंचलित हवामान केंद्र देणार आपत्तीची पूर्वसूचना

रायगड जिल्ह्यात 82 ठिकाणी उभारणी

अलिबाग : प्रतिनिधी
पावसाळयात उदभवणारया पूर आणि दरड दुर्घटनांपासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाबरोबरच वातावरणातील इतर महत्वाच्या घडामोडींच्या नोंदी ठेवण्यासाठी जिल्हयात स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 82 ठिकाणी अशी केंद्र स्थापन करण्यात आली असून त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज मिळून नैसर्गिक आपत्तीत होणारी जीवीत व वित्तहानी टाळता येणे शक्य होणार आहे.
जिल्ह्यात पावसाचा अंदाज यावा यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याच्या सूचना भुवैज्ञानिक सर्वेक्षणात दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 82 महसूल मंडळ केंद्र येथे यंत्रणा बसवली आहे. महाड सावित्री नदीच्या पाणलोट क्षेत्रात 26 ठिकाणी 13 लाख रुपये मंजूर निधीतून स्वयंचलीत यंत्र बसवले गेले आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज येऊन अतिवृष्टीमुळे पुढील होणारी दुर्घटनांमध्ये होणारे नुकसान काही प्रमाणात थोपवणे शक्य होणार आहे. सावित्री नदीची धोकादायक पाणी पातळी मोजण्यासाठी दोन ठिकाणी यंत्रणा बसवली आहे.

कसे चालते केंद्राचे काम
कृषी विभाग आणि हवामानाचा अंदाज वर्तवणारी स्कायमेट संस्था यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवला जात आहे. या स्वयंचलित हवामान केंद्रातून कमाल किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, वारयाचा ताशी वेग, दिशा, सुर्यप्रकाशाचा कालावधी, पाऊस, बाष्पीभवनाचा वेग, जमिनीचे तापमान, जमिनीचा ओलावा याच्या नोदी सहजपणे उपलब्ध होत असतात. त्यासाठी स्वतंत्र साफटवेअर विकसीत करण्यात आले आहे. त्याचा सर्व्हर पुण्यात असून एसएमएसव्दारे ही माहिती सर्व्हरला दैनंदिन पुरवली जाते. यामुळे पावसाचा आणि त्यामुळे उदभवणारया आपत्तींचा अंदाज येवून आपत्तीपूर्व उपाययोजना करणे शक्य होते. शिवाय हवामानावर आधारीत शेती करणे किंवा शेतीचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

यंत्रणा सक्षमीकरणावर भर
रायगड जिल्ह्याला गेल्या 15 वर्षांत अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन काहीसे अपुरे पडले होते, मात्र वर्षभरात आपत्ती व्यवस्थापन सक्षम करण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष पुरवले आहे. अतिवृष्टी, दरड दुर्घटना, पूरस्थिती काळात आपत्ती व्यवस्थापन सक्षम असणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सक्षम आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यावर भर दिला आहे

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply