पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेतील रस्ता रूंदीकरण करताना झोपडपट्टीधारकांना आणि दुकानांना हटवण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यामुळे या बाबीचा गंभीरपणे विचार करून बाधित झोपडपट्टी आणि दुकानांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून मगच अतिक्रमणविषयक कारवाई करावी, अशी विनंती महापालिकेच्या नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दर्शना भोईर यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
पनवेल महापालिका हद्दीतून एनएच-4 हा महामार्ग जात आहे. या महामार्गाचे रूंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शिवाजीनगर, नवनाथनगर, इंदिरानगर आणि लक्ष्मी वसाहत क्रमांक 1, 2, 3 या ठिकाणच्या झोपडपट्ट्या आणि दुकानांचे अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा महापालिका प्रशासनाने संबंधितांना दिल्या आहेत.
मात्र या झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास असलेले नागरिक खूप पूर्वीपासून तेथे राहत आहेत. त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांनी तेथेच स्वतःच्या घरात दुकाने थाटली आहेत, असे नगरसेविका दर्शना भोईर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
या झोपडपट्टीधारकांना महापालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेचे व्हीआरपी क्रमांक देण्यात आले आहेत, तसेच ते रहिवासी घरपट्टीही भरत असून त्यांच्याकडे व्यवसायाचे परवाने व इतर पावत्याही आहेत, असेही दर्शना भोईर यांनी पत्रात म्हटलेे आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन न झाल्यास ते नागरिक बेघर होतील आणि त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणातही खंड पडेल तसेच त्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे त्यांना हटवण्याआधी त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे, असेही दर्शना भोईर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
-सदरच्या रस्त्याचे एमएसआरडीसीच्या माध्यमातून रूंदीकरण होत आहे, मात्र बाजूला असलेली झोपडपट्टी आणि दुकानांमुळे रस्तारूंदीकरणाचे काम रखडले आहे. सदर रस्ता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीसाठी मोकळा होणे आवश्यक आहे. या झोपडपट्टीवासीयांचा रस्ता रूंदीकरणाला आणि विकासाला विरोध नाही असे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. म्हणून महापालिका प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा करून व सुसंवाद घडवून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजप सन्मानजनक तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे.
-जयंत पगडे,
अध्यक्ष, पनवेल शहर भाजप