दीड कोटींचा मुद्देमाल जप्त; नवी मुंबई पोलिसांची कामगिरी
पनवेल : वार्ताहर
जेएनपीटी बंदरातून सिल्वासाच्या दिशेने दीड कोटी रुपयांचे 25 टन कॉपर घेऊन निघालेला कंटेनर ट्रेलर बेलापूर येथून पळवून नेणार्या सहा जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुद्देमालासह अटक केली आहे. जेएनपीटीहून निघालेला हा कंटेनर ट्रेलर उलवे-बेलापूर मार्गावरील रेतीबंदर येथे अडवून या टोळीने ट्रेलरचालकाला मारहाण करून कंटेनर पळवून नेला होता. कंटेनरचा अपहार करणार्या सहा जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच दिवसातच अटक करून चोरलेला दीड कोटींचा मुद्देमालही जप्त केल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दुबईतून जेनएपीटी बंदरात आलेला 25 टन वजनाचा कॉपरचा माल स्टारलाईट टेक्नॉलॉजी लि. कंपनीचा कंटेनर ट्रेलर गत 14 मे रोजी रात्रीच्या सुमारास सिल्वासाच्या दिशेने निघाला होता. हे कंटनेर उलवे-बेलापूर रोडवरील रेतीबंदर येथे आला असता मोटारसायकल आणि कारमधून आलेल्या लुटारू टोळीने त्यांची वाहने या कंटेनर ट्रेलरपुढे आडवी लावली.
यानंतर या टोळीने ट्रेलर चालकाला मारहाण करून कॉपर मालाने भरलेला कंटनेर घेऊन पलायन केले.
या गुन्ह्यासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर आणि त्यांच्या पथकाने पेण येथे सदरचा कंटेनर ट्रेलर अखेर जप्त केला, तसेच सदर गुन्ह्यात सहभागी असलेल्या सागर म्हात्रे (फुंडे-उरण), अमित म्हात्रे (फुंडे-उरण), रूपेश म्हात्रे (आवरे-उरण), प्रसाद पाटील (पिरकोन-उरण), अरविंद गावंड (आवरे-उरण), चेतन ठाकूर (चिरले-उरण) अशा सहा लुटारूंना विविध ठिकाणाहुन जेरबंद केले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सागर म्हात्रे याच्यावर चंदन तस्करी, मारामारी, तर अमित म्हात्रे याच्यावर विनयभंग, रूपेश म्हात्रे याच्यावर खून आणि चेतन ठाकूर याच्यावर मारहाण करणे अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सागर म्हात्रे याने सहकार्यांच्या मदतीने अशा प्रकारचा गुन्हा करण्याचा बर्याच दिवसांपासून प्लॅन आखला होता.
अटेकेतील सर्वच आरोपी उरण परिसरात राहत असल्याने त्यांना याच परिसरातील जेएनपीटी-उरण मधील सी.एफ.एस. कामाची माहिती होती. त्यामुळेच त्यांनी कंटेनर लुटीचा प्लॅन आखून तो लुटण्याचा गुन्हा केल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार म्हणाले.
दरम्यान, अटकेतील आरोपींना 19 मे रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना येत्या 26 मे पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा ठोठावली आहे.
पत्रकार परिषदेस नवी मुंबईचे सह-पोलीस आयुक्त डा़ॅ सुरेश मेकला, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोशी, वाहतूक शाखाचे पोलीस उपायुक्त संजय लोखंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम, आदी उपस्थित होते. या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये गुन्हे शाखा नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, राजेश गज्जल, पोलीस उपनिरीक्षक राणी काळे, योगेश देशमुख, पोलीस हवालदार प्रदीप कदम, पोपट पवार, अनिल यादव, ज्ञानेश्वर बनकर, भोरे, पोलीस नाईक किरण राऊत, प्रकाश साळुंखे, सागर हिवाळे, नवनाथ कोळेकर, युवराज जाधव, दिलीप भास्करे, सचिन धनवटे, विजय पाटील, मिथुन भोसले, सतीश चव्हाण, मेघनाथ पाटील, मौर्या, गडकरी, ढगे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.