पनवेल : रामप्रहर वृत्त
अयोध्या येथील श्री राम मंदिरात सोमवारी झालेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मन हे राम रंगी रंगीले हा श्री रामगाथा अर्थात मराठी गीत व अभंगांचा सुश्राव्य कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेल येथे झालेल्या या गीत, अभंग, रथ, पालखीने रामलल्लाचे दर्शन घडविले.
पनवेल शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर झालेल्या मन हे राम रंगी रंगीले या सुश्राव्य मराठी गीत व अभंगांच्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र, ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम सुप्रसिद्ध गायिका रश्मी मोघे व गायक जयदीप बगवाडकर यांनी श्री रामप्रभूंवरील गीते व अभंग सादर करीत वातावरण भक्तीमय केले. विशेष म्हणजे या ठिकाणी अयोध्येत साकारलेल्या राम मंदिराची प्रतिकृती, भव्य रांगोळी व अयोध्या लढ्यावर आधारित प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. त्याचा हजारो नागरिकांनी अनुभव घेतला. तत्पूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन, श्री राम अक्षता कलश पूजन आणि प्रातिनिधिक स्वरूपात पनवेलमधील कारसेवकांचा सन्मान करण्यात आला.
मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी प्रभू श्री रामाची पालखी पनवेल शहरातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यानिमित्त मंदिरात आरती झाली तसेच प्रसाद म्हणून लाडूंचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून सुरुवात झालेली ही पालखी पुढे हनुमान मंदिर, गावदेवी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्गक्रमण करून समारोप गुजराती शाळा येथे झाला. या ठिकाणी अयोध्या येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, त्यानंतर भाविकांसाठी दर्शन आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी पनवेलमधील कारसेवकांचा व छोट्या मंदिरांतील पूजार्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. सत्कार केलेल्या कारसेवकांमध्ये नंदा ओझे, विजय भिडे, अविनाश कोळी, उमेश मानकामे (पोद्दार), श्यामनाथ पुंडे, अशोक कदम, मकरंद निमकर, सूर्यकांत फडके, अजय आचार्य, रजनीश म्हात्रे, भूषण हजारे, सुधीर चितळे, कमल दाबके यांचा समावेश होता.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, अमित ओझे, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, संजय भगत, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, युवा मोर्चा सुमित झुंझारराव, शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, माजी नगरसेवक राजू सोनी, प्रभाकर बहिरा, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, वृषाली वाघमारे, सुलोचना कल्याणकर, स्वाती कोळी, ज्योती देशमाने, संजय जैन, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, केदार भगत, गणेश भगत, मधुकर उरणकर, युवा मोर्चा सरचिटणीस चिन्मय समेळ, मयुरेश खिस्मतराव, प्रितम म्हात्रे, वैभव बुवा यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुमच्या-आमच्या मनात आणि जगाच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 ही तारीख सुवर्णाक्षरात लिहिली गेली आहे. इथे साजर्या होणार्या 490 वर्षांच्या इतिहासामध्ये आपल्यापैकी प्रत्येक जणाला आधीच्या पिढीने सांगितले की, प्रभू राम हे आपल्या संस्कृतीचे आद्यपुरुष, मानचिन्ह, प्रतिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनाही बालपणी माता जिजाऊ या रामायण, महाभारत यांचे दाखले देत असत. आपल्या आधीच्या पिढ्यांनीही आपल्यावर संस्कार घडावे म्हणून हे दाखले दिले. त्यामुळे त्या पिढीला सातत्याने वाटत राहिले की आमचा वारसा असलेले श्री रामप्रभू त्यांच्या जन्मभूमीत तंबूमध्ये का? आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर साकारले आहे. आमच्या जिल्हा अध्यक्षांसह अनेक कारसेवकांनी श्री रामप्रभूंचे मंदिर त्या ठिकाणी होण्यासाठी सेवा केली. त्याचा आम्हाला व पनवेलकरांना अभिमान आहे. या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले.
-प्रशांत ठाकूर, आमदार