उरण ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे बंदर उभारणीच्या कामाला गती देण्यात येत असून त्यासाठी 153 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. करंजा मच्छीमार बंदरासाठी आमदार महेश बालदी यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांना पूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय या ठिकाणी अत्याधुनिक अशी जेटी तयार करण्यात येणार असून हे बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 1) येथे केले.
आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने उरण नगर परिषदेमार्फत पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण आणि नवीन विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हा सोहळा उरण येथील महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. नारायण (नानासाहेब) विष्णू धर्माधिकारी नगर परिषद मराठी शाळा, पेन्शनर्स पार्क या ठिकाणी झाला. त्या वेळी ते बोलत होते.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उद्योग व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, विशेष अतिथी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तर प्रमुख उपस्थिती आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी यांची होती. त्याचप्रमाणे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक समीर जाधव, सहपोलीस आयुक्त संजय ऐनपुरे यांच्यासह पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्हावा-शिवडी अटल सेतूमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. भविष्यात उद्योगाचे खरे मॅग्नेट रायगड जिल्हा होणार आहे. यामुळे जिल्ह्यात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. नवी मुंबई विमानतळामुळे जीडीपीमध्ये 1 टक्के वाढ होणार आहे. डेटाचे हब म्हणून रायगड आणि नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. या दोन भागांमधून मोठ्या प्रमाणात डेटाची निर्मिती होत असून देशपातळीवर डेटा सेंटर्सची 60 टक्के क्षमता ही रायगड आणि नवी मुंबईत आहे.त्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून रायगड जिल्हा होणार आहे.
मच्छीमारांचे हित जोपासत वाढवण बंदराची उभारणी करण्यात येत आहे. या बंदरामुळे निर्यात क्षमता वाढणार आहे. ग्लोबल सप्लाय चेनचा भाग आपण आता झालो आहोत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आमदार महेश बालदी हे अतिशय अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अतिशय कल्पकतेने मतदारसंघात दर्जेदार व उत्कृष्ट विकासकामे केली आहेत. त्यांच्या प्रत्येक विकासकामासाठी पुरेसा निधी आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. उरणच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिली.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महेश बालदी सातत्याने आग्रही असतात. उरणमध्ये सर्वसमावेशक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. उरणच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे काम आमदार बालदी यांनी केले आहे. उरणच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे यांचे समयोचित भाषण झाले. प्रास्ताविकात आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा पुनःरूच्चार केला.
या वेळी 11 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले उरण नगर परिषद प्रशासकीय भवन, 4.35 कोटी खर्चाचे सावित्रीबाई फुले फुल मार्केट, 4.10 कोटी खर्चाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि समाज विकास केंद्र, दोन कोटी 53 लाख खर्चाचे चारफाटा मच्छीमार्केट यांचे लोकार्पण तसेच उरण येथे 82.54 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …