Breaking News

थिएटर नाटकाचे पडदा सिनेमाचा

मुंबईतील प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमी संकुलातील रवींद्र नाट्य मंदिर आता अतिशय अद्ययावत व आधुनिक तांत्रिक सुवाधांसह सज्ज झाले असून तेथे आता रंगभूमीवर नाटक, एकांकिका, वाद्यवृंद, काही महत्वाचे सोहळे (इव्हेन्टस) आपल्याला पहायला मिळणार आहेत तसेच आता तेथे आवश्यकतेनुसार रूपेरी पडद्याचीही व्यवस्था करण्यात आली असून तेथे मराठी चित्रपटदेखील पहायला मिळणार आहेत. नाट्यगृहात चित्रपट अशी ही कल्पना आहे. दादर, प्रभादेवी, वरळी या परिसरातील मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांकडून या गोष्टीला निश्चितच सकारात्मक उत्फूर्त प्रतिसाद मिळेल.
नाट्यगृहात चित्रपट दाखविण्यात यावेत अशी विविध संघटनांकडून काही महिन्यांपासून होत असलेल्या मागणीला पुणे शहरातील नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या चित्रपटांच्या खेळास मिळालेल्या प्रतिसादावरून उत्साह वाढला आहे.
पुणे महानगरपालिकेने नाट्यगृहांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी पडदा बसविण्याचा विचार केला असून येणार्‍या अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूददेखील करणार आहे, पुणे शहरातील औंध येथील पं. भीमसेन जोशी, घुले रोड येथील पं. जवाहरलाल नेहरू आणि येरवडा येथील अण्णाभाऊ साठे या तीनही नाट्यगृहांमध्ये पडदा बसविण्याचे पुणे महानगरपालिकेने ठरविले आहेत, असेही एक वृत आहे.
नव्वदच्या दशकात मुंबईत असा एक प्रयत्न झाला होता. गिरगावातील साहित्य संघ मंदिर, धोबीतलाव येथील रंगभवन येथे दररोज सायंकाळी मराठी चित्रपट दाखविण्यात येत होता. वृत्तपत्रातून तशी बातमी व चित्रपटाच्या जाहिरातीदेखील प्रसिद्ध झाल्या, पण तेव्हा या प्रयत्नात चित्रपटाची एक प्रिंट अडकून पडते असे दिसून आल्याने ते प्रदर्शन थांबविण्यात आले. आज डिजिटल युगात आपण आहोत, आज मराठी चित्रपटांची निर्मिती फार वाढलीय, बजेट वाढलयं, रसिक प्रेक्षक मराठीतील वेगळ्या विषयांचे स्वागत करतोय, जवळपास प्रत्येक आठवड्यात विविध माध्यम समूह इत्यादींकडून आकर्षक व देखण्या मनोरंजन क्षेत्रासाठीच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. प्रसार माध्यमातून मराठी चित्रपटांना भरघोस प्रसिद्धी मिळतेय, मराठी चित्रपट रसिक आज नाट्यगृहात चित्रपट पाहू इच्छितोय. त्यामुळे आता रंगभूमीवर चित्रपट ही गोष्ट लोकप्रिय होईल.
मुंबईतील इंग्रजकालीन चित्रपटगृह ही मुळात असा एक फ्लॅशबॅक यानिमित्त सांगावासा वाटतो. एखाद्या नाटकात (विशेषतः फॅन्टसी नाटकात) एकादी व्यक्तिरेखा स्टेजवर चक्क खालून प्रवेश करते. म्हणजे जमिनीतून ती व्यक्तीरेखा येते. पूर्वी एकाद्या पौराणिक नाटकातही असा नाट्यमय प्रसंग असे आणि त्यासाठी त्या नाट्यगृहाच्या रंगमंचाची रचना असे. हे वेगळ्या संदर्भात येथे सांगतोय. आज तुम्ही धोबीतलाव येथील इंग्रजकालीन एडवर्ड थिएटरला भेट दिली, तुम्हाला तेथे पडद्यासमोर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होऊ शकतो अशी रचना दिसेल आणि तुम्ही जर आपले कुतूहल पूर्ण करण्यासाठी त्याच पडद्यामागे तळघरात गेल्यास तेथे तुम्हाला तेथून पडद्यासमोर येणारी अथवा नेणारी अशी छोटीशी लिफ्ट दिसेल. अगदी आजही ती लिफ्ट कायम आहे हे विशेषच आहे. अशी तेथे लिफ्ट का? तर एडवर्ड हे मूळचे नाटकाचे थिएटर आहे. त्या काळातील अशा वास्तूत मराठी, हिंदी, इंग्लिश नाटकांचे प्रयोग, जादूचे प्रयोग, वाद्यवृंद यांचे आयोजन करण्यात येई. 1914 साली ते सुरू झाले आणि आजही तेथील खेळ चालू नसला तरी ही इमारत उभी आहे. एडवर्ड चित्रपटगृह दोन मजली. (अथवा दोन बाल्कनी) त्यातील सर्वात वरच्या मजल्यावरील बाल्कनीची अनेक वर्ष महिला प्रेक्षकांना तिकीटे न देण्याची प्रथा होती. याचे कारण तेथे जाण्यासाठीच्या पायरीवर कोणा स्री प्रेक्षकाची साडी अथवा अन्य पोषाख अडकू नये अशीच त्यामागची भावना. एडवर्ड हे प्रामुख्याने रिपीट रन चित्रपटासाठीचे म्हणून ओळखले जाई. मी गिरगावात राहताना अनेक तरी जुने चित्रपट याच एडवर्डला रिपीट रनला रिलीज झाल्यावर पाहिले. एडवर्डला काही नवीन चित्रपटही प्रदर्शित होत. ‘जय संतोषी मा’ (रिलीज 30 मे 1975)ने येथे खणखणीत ज्युबिली हिट यश संपादले. मूळ नाट्यगृहात चित्रपट रूजत गेला.
विशेषतः दक्षिण मुंबईतील काही जुनी एकपडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स ही अगदी सुरुवातीच्या काळात नाटक, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, जादूचे प्रयोग, वाद्यवृंद यासाठीच होती आणि त्या काळाशी ते सुसंगत असेच ते होते. आणि त्या काळात प्रामुख्याने शनिवार रविवार अशा दोनच दिवशी नाट्यप्रयोग होत.
आपल्या देशात चित्रपटाचा पहिला खेळ 7 जुलै 1896 साली झाला. म्हणजे त्याला आता सव्वाशे वर्षांचा कालावधी झाला आहे. फ्रान्सच्या ल्युमिए बंधुंनी मुंबईच्या वॅटसन हॉटेलमध्ये ’अरायव्हल ऑफ ट्रेन’ हा काही मिनिटांचा खेळ दाखवला. त्या काळात चित्रपट ही कला आपल्याकडे ज्ञात नव्हती. चालती फिरती चित्रे अशा दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले जाई. त्यामुळे चित्रपटगृह ही संकल्पनाही नव्हती. नाटक आणि संगीत (आणि त्यात संगीत नाटकही) तसेच स्टेजवरचे मनोरंजन हळूहळू रूजत होते आणि त्यानुसार ’नाट्यगृह’ उभी राहिली.
आज जेथे न्यू एक्सलसियर थिएटर आहे. तेथे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नॉव्हेल्टी नावाचे असेच एक नाट्यगृह होते असा एक संदर्भ आहे. ते पाडून 1910 साली एक्सलसियर हे चित्रपटगृह उभारले आणि मग तेही पाडून 1975 साली न्यू एक्सलसियर उभे राहिले. अशा पद्धतीने मूळ नाट्यगृह असणे असे आणखी काही चित्रपटगृहाबाबत दिसतेय. न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात 5 मार्च 1975 रोजी शक्ती सामंता दिग्दर्शित अमर प्रेम (1972) या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात येऊन त्याचे उद्घाटन झाले, तर 7 मार्च 1975 रोजी राज खोसला दिग्दर्शित ‘प्रेम कहानी’ प्रदर्शित होत ते चित्रपट रसिकांसाठी खुले करण्यात आले. न्यू एक्सलसियरच्या इमारतीतील चौथ्या मजल्यावर मिनी थिएटर होते. मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी याच मिनी थिएटरमध्ये मराठी व हिंदी चित्रपटांचे खेळ आयोजित केले जात. नव्वदच्या दशकाच्या मध्यास ते बंद झाले. ‘अबोध’च्या प्रेस शोला माधुरी दीक्षित, तर ‘हीरो’च्या प्रेस शोला जॅकी श्रॉफ आल्याचे मला चांगलेच आठवत आहे.
दक्षिण मुंबईतीलच रॉयल ऑपेरा हाऊसहेदेखील मूळचे इंग्रजकालीन असे अतिशय देखणे असे नाट्यगृहच. लंडनचा जसा ’ऑपेरा’ आहे तसाच तो मुंबईत असावा अशा संकल्पनेतून 1911 साली त्याची उभारणी केली आहे. पाचवा किंग जॉर्जच्या हस्ते तेव्हा या वास्तूचे उदघाटन झाले. दोन बाल्कनी असलेल्या या वास्तूच्या तळमजल्यावर म्हणजे स्टेजच्या अगदी समोरच्या आसनव्यवस्थेत दोघांच्या मध्ये थोडेसे अंतर राखले होते, तर दोन्ही बाजूला आणि मागे मिळून बॉक्सची व्यवस्था केली गेली. काही बॉक्समध्ये दोन तर काही बॉक्समध्ये चार अथवा सहा अशी सहकुटुंब आनंद घ्यावा अशी व्यवस्था. मुख्य वास्तूबाहेर असलेल्या प्रशस्त मोकळ्या जागेत त्या काळात उच्चभ्रू रसिक व्हिक्टोरियामधून ऐटीत येत. एकदम साहेबी थाटाची वास्तू ही याची खासियत आजही कायम आहे. बाहेरच एका बाजूला ऑपेरा हाऊस फाऊन्टन सोडा या नावाचे उपहारगृह. तेथील केक आणि खारी प्रसिद्ध होती. अशा या एकेकाळच्या नाट्यगृहात 1912 साली अमेरिकन जादुगर रेमण्डस यांचा खेळ झाला. फ्रेन्च पॅथे यांच्या मनोरंजन खेळांचे आयोजन झाले. अ‍ॅन्डरसन यांच्या नाटकाचे प्रयोग रंगले. इतकेच नव्हे; तर याच वास्तूत बालगंधर्व, मा. कृष्णराव, किर्लोस्कर, दीनानाथ मंगेशकर यांच्याही नाटकाचे प्रयोग रंगले. लता मंगेशकर यांनी आपला पहिला गाण्याचा कार्यक्रम याच ऑपेरा हाऊसमध्ये साजरा केला. पृथ्वीराज कपूर यांच्या ’पठाण’ वगैरे नाटकाचे प्रयोग रंगले. त्या काळात वातानुकुलीत असा काही प्रकार नव्हता. कार्यक्रम रंगणे जास्त महत्त्वाचे होते. 1930 सालापासून येथे मूकपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आणि मग 1935 सालापासून नियमितपणे हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. मूळ दोन बाल्कनी कायम ठेवूनच हा प्रवास सुरू झाला आणि 1993 सालापर्यंत तो चालू होता. त्यानंतर ते काही कारणास्तव बंद झाले आणि आता 2016 साली पुन्हा एकदा सुरु झाले . आता ते वातानुकूलित आणि अतिशय देखणे असे आहे. आणि विशेष म्हणजे येथे मामी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तरी आता तेथे प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी नाटकाचे प्रयोग होतात. म्हणजे मूळ नाट्यगृह आता पुन्हा नाट्यगृह म्हणूनच कार्यरत आहे. एक वर्तुळ पूर्ण झाले म्हणायचे. ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात सरस्वतीचंद्र, उपकार, दो रास्ते, शोर, रोटी कपडा और मकान, अमर अकबर अ‍ॅन्थनी, मौसम, देवता, बरसात की रात अशा अनेक चित्रपटांनी रौप्य वा सुवर्ण महोत्सवी यश संपादले. सतिश कुलकर्णी निर्मित व सचिन पिळगांवकर दिग्दर्शित नवरी मिळे नवर्‍याला हा येथे प्रदर्शित झालेला एकमेव मराठी चित्रपट. त्याने चक्क चार आठवड्यांचा मुक्काम केले..नव्वदच्या दशकात तेथील चित्रपट प्रदर्शित होणे स्थगित झाल्यावर तेथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले. एन. चंद्रा दिग्दर्शित ‘वजूद’ची नाना पाटेकर व माधुरी दीक्षित यांच्यावरील काही महत्त्वाची दृश्ये येथेच चित्रीत करण्यात आली. तेव्हा माझे सेटवर जाणे झाले होते. आता ते नव्याने सज्ज झाल्यावर प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी (2022)चा पहिला इव्हेंट या ऑपेरा हाऊसच्या रंगमंचावर छान रंगला. काही हिंदी चित्रपटांचेही इव्हेंट येथे होत असतात. काही मराठी नाटकांचे प्रयोग येथे आयोजित करण्यात येताच त्यातील कलाकारही ऑपेरा हाऊसच्या अनुभवाने प्रभावित होतात. ऑपेरा हाऊस या वास्तूला स्वतःचे अस्तित्व आहे, ओळख आहे, इतिहास तर आहेच आहे. पूर्वी ऑपेरा हाऊस चित्रपटगृहावरचे भव्य दिमाखदार डेकोरेशन पहायलाही गर्दी होई. ते दिवसच वेगळे होते. वातावरण वेगळे होते.
शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी प्रामुख्याने शनिवार व रविवार अशा दोनच दिवशी नाटकाचे प्रयोग होत. त्यामुळे नाट्यगृहांची संख्यावाढ हा महत्त्वाचा घटक नव्हताच. अशातच विदेशातून मूकपट येऊ लागले. तेही वीस मिनिटे ते एक तासाचे असत. आणि त्याचे खेळ अगदी तंबूतही होत. आपल्याकडे दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेला पहिला मूकपट ’राजा हरिश्चंद्र’ हा 3 मे 1913 रोजी गिरगाव परिसरातील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि आपल्याकडे व्यावसायिक पातळीवरील चित्रपट प्रदर्शित होणे सुरु झाले. सुरुवातीला असेच काही मूकपट निर्माण झाले आणि मग चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ’अयोध्येचा राजा’ (6 फेब्रुवारी 1932 रोजी प्रदर्शित झाला) पासून मराठी बोलपटाची निर्मिती सुरू झाली. दिग्दर्शक अर्देशीर इराणी यांनी ’आलम आरा’ (1931) हा पहिला हिंदी बोलपट निर्माण केला. हे दोन्ही चित्रपट आमच्या गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमागृहात प्रदर्शित झाले. ते मूकपटाच्या काळापासून कार्यरत होते. आज त्या जागी उंच इमारत उभी असून मॅजेस्टिक सिनेमागृहाच्या कोणत्याही खाणाखुणा शिल्लक नाहीत.
या प्रवासात दक्षिण मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील (पूर्वीचा लॅमिन्टन रोड) पाथे (नंतरचे स्वस्तिक. नंतर ते बंद), इम्पिरियल थिएटर येथे अगदी सुरुवातीला एखाद्या नाटकाचा अथवा मनोरंजनाच्या खेळाचे आयोजन होई. चित्रपटगृहांचा इतिहास असा खोलवर आहे. तीस आणि चाळीसच्या दशकात दक्षिण मुंबईत कुलाबा परिसरात गॅरीसन, तर धोबी तलाव परिसरात सेंट झेवियर्स, वेलिंग्टन या नावाची एकाच वेळेस कधी इंग्रजी नाटक, तर कधी इंग्रजी चित्रपट प्रदर्शित करण्याची थिएटर होती. ती काळाच्या ओघात बंद पडली आहेत. त्यांची नोंदही फारशी सापडत नाही. चित्रपटाच्या इतिहासाप्रमाणेच चित्रपटगृहाचाही इतिहास महत्त्वाचा. त्या माध्यमातून चित्रपट रसिकांपर्यंत पोहचत राहिलाय. बायस्कोप ते ओटीटी असा तो मोठाच प्रवास आहे.
मूळ नाटकाची असलेल्या एडवर्डची वास्तू मात्र शंभर वर्षांपूर्वीच्या उत्तम आणि मजबूत बांधकामाचा प्रत्यय देते. ऑपेरा हाऊस तर एक प्रकारची इंग्रजकालीन रचनेची आठवण देणारी देखणी वास्तू आहे.
अशी चित्रपटगृहे मूळची नाट्यगृह आहेत. त्यात वावगं असं काही नाही. याचे कारण म्हणजे नाटक या माध्यमाची दृश्य माध्यमातील तांत्रिक प्रगती म्हणजे चित्रपट अशीच या कलेची सुरुवात झाली आणि अगदी सुरुवातीच्या काळात काही चित्रपटांवर नाटकाचा प्रभाव होता ही वस्तुस्थिती आहे… आणि आता मनोरंजन क्षेत्र अतिशय व्यापक व चौफेर वाटचाल करीत असतानाच नाट्यगृहात चित्रपटाचाही पडदा असावा या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहचलो आहोत. तालुक्याच्या ठिकाणी नवीन मनोरंजन संकुल उभारताना त्यातील सभागृहात नाटक, चित्रपट, वाद्यवृंद, जादूचे प्रयोग, व्याख्यान अशा अनेक गोष्टींचा समावेश असावा आणि जोडीला वाचनालय, कला दालन असावे असलेली अपेक्षा स्वागतार्ह…!

-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply