Breaking News

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम

स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार, लोकप्रतिनिधी सत्कार, गुणीजनांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक, पंचायत समितीचे माजी सभापती, स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 38व्या पुण्यतिथीनिमित्ताने येत्या गुरुवारी (दि.7) सायंकाळी 6 वाजता उलवे नोडमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
उलवे नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर मैदानावर होणाऱ्या या समारंभात विशेषत्वाने पनवेल तालुकास्तरीय स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2026चे बक्षीस वितरण तसेच पनवेल-उरण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार; त्याचबरोबर शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा पारितोषिक सन्मान समारंभ आणि ‘द फोक मराठी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेलचे महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, उपमहापौर प्रमिला पाटील, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य अनिल भगत, प्रकाश भगत, संजय भगत, वसंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
स्व. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रूजवत फक्त राजकारण नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. भगतसाहेबांनी अहोरात्र आपला देह ‌‘बहुजन हिताय बहुजन सुखाय‌’ या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. तळागाळातील लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. दारिद्य्र व भूक यांच्याबद्दल अगदी मनापासून तळमळ होती. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामुळेच होऊ शकते हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना भगतसाहेबांच्या अंतःकरणात कायम होती. त्याचबरोबर देवदूताची भूमिकासुद्धा पार पाडत त्यांनी समाजाला न्याय दिला आहे. त्यामुळे भगतसाहेबांची किर्ती अजरामर राहिली आहे.
भगतसाहेबांची जयंती फेब्रुवारी लीप महिन्यामुळे दर चार वर्षांनी असते. त्यावेळी राज्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीला त्यांच्या नावे बहुमानाचा पुरस्कार दिला जातो, तर दरवर्षी पुण्यतिथीलाही सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत युवा पिढीला प्रेरणा देण्याचे काम केले जाते. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे अनन्यसाधारण महत्त्व असून नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व पनवेल महापालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस.टी. गडदे यांनी केले आहे.

Check Also

पनवेलमध्ये स्वगणनेला प्रारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली स्वतःची नोंद

पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र सरकारच्या जनगणना उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून …

Leave a Reply