Breaking News

मराठी चित्रपटांसाठीचे पुरस्कारही वैशिष्ट्यपूर्ण

चित्रपट संस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, पुरस्कार. असे पुरस्कार म्हणजे आपण केलेल्या कामाची विशेष दखल आणि यापुढेही अधिक चांगले काम करावे याची दिली जात असलेली जाणीव.
अनेक गोष्टींसाठी आज पुरस्कार दिले/घेतले जाताहेत. त्याने प्रोत्साहन मिळते, ‌‘मीच पुरस्कार पटकावला‌’ असा काहींचा इगोही सुखावतो, ‌‘मला नामांकन होते‌’ अशी प्रोफाईलमध्ये नोंद वाढते. तेदेखील खूप महत्त्वाचे असते. माणसं तेवढी वृत्ती/प्रवृत्ती हा अलिखित नियम अभिनय क्षेत्रांतही लागू पडतो.
अनेक पुरस्कारांमधील एक बालकलाकाराचा पुरस्कार. तोही खूप महत्त्वाचा, आत्मविश्वास वाढवणारा आणि त्याच्या काही मोजक्या खास आठवणी सांगतो.
तुम्हालाही माहित्येय, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांनी साठच्या दशकाच्या सुरुवातीला बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरू केली. विशेष म्हणजे लागोपाठच्या वर्षी या दोघांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून अभिनयाचा पुरस्कार प्राप्त झाला. १९६३-६४ साली सचिन पिळगावकरला सुधीर फडके निर्मित आणि राजा परांजपे दिग्दर्शित ‌‘हा माझा मार्ग एकला‌’साठी तर १९६४-६५ साली महेश कोठारेला राम गबाले दिग्दर्शित ‌‘छोटा जवान‌’साठी मिळाला. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर १९६२ साली राज्य शासनाकडून हा चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येऊ लागले, पण पहिल्या सोहळ्यात बालकलाकाराचा पुरस्कार नव्हता, मात्र ‌‘हा माझा मार्ग एकला‌’ या चित्रपटातील बालकलाकार सचिन पिळगावकरच्या कामाचे सर्वत्र विशेष कौतुक झाल्याने हा पुरस्कार सुरू करण्यात आला. आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयाचा पुरस्कार पटकावण्यात हे दोघेही यशस्वी ठरले.
ही खास गोष्ट अथवा स्टोरी इतक्यावरच थांबत नाही… महेश कोठारेने वयात आल्यावर नायक/निर्माता/दिग्दर्शक/वितरक अशी चौफेर धूमधडाका करत ‌‘धडाकेबाज‌’ वाटचाल सुरू केली आणि त्याच ‌‘झपाटलेला‌’ वाटचालीत एक चित्रपट होता, माझा छकुला ( १९९४). त्यात महेश कोठारेचा मुलगा आदिनाथ कोठारे बालकलाकार होता आणि आदिनाथला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य शासनाकडून पुरस्कार प्राप्त झाला. एक छान योगायोग म्हणता येईल.
असाच आणखी एक छान योगायोग घडला. सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‌‘एकुलती एक‌’ (२०१३) या चित्रपटाव्दारे श्रिया पिळगावकरने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकताच आपल्या या पहिल्याच चित्रपटातील अभिनयासाठी ‘सर्वोत्कृष्ट नवतारका’ हा राज्य चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकावला. म्हणजेच, पिता आणि पुत्र यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयात राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झालाय. अशा योगायोगाच्या गोष्टी जशा रंजक आहेत, तशाच त्या विजेत्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या आहेत.
बालकलाकाराला पुरस्कार या गोष्टीत आणखी एक रंग. जेव्हा पहिल्यांदाच आपला मराठी चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला गेला होता, तेव्हाची आठवण सांगायलाच हवी. कथी आर्ट्स निर्मित आणि संदीप सावंत दिग्दर्शित ‌‘श्वास‌’ (२००३) या चित्रपटाची तशी निवड झाली रे झाली आणि मराठी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, माध्यम, राजकीय क्षेत्रात अबब… म्हणावी अशी प्रचंड सकारात्मक प्रतिक्रिया उमटली. उर्जा निर्माण झाली. याच ‌‘श्वास‌’मधील बालकलाकार अश्विन चितळे याची तेव्हाची एक प्रतिक्रिया अगदीच वेगळी होती हो. वयानुसार माणसाच्या प्रतिक्रिया असतात अथवा हव्यात आणि हा अलिखित नियम कलाकारांनाही लागू होतोच की. तीही माणसेच. हाडामासाची, विविध भावभावनांची. चेहरा रंगवल्यावर ते कलाकार असतात आणि कलाकार जेव्हा माणूस म्हणून वावरतो तेव्हा काही काही प्रतिक्रिया भाबड्या वाटल्या तरी त्या संयुक्तिक असतात. त्या त्या वयानुसार असतात.
ऑस्करसाठी ‌‘श्वास‌’ पाठवला जाण्याच्या काही दिवस अगोदर या चित्रपटाला भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सुवर्ण पदकाचा मान प्राप्त झाला तेव्हाची गोष्ट. अत्रे पिक्चर्स निर्मित आणि आचार्य अत्रे दिग्दर्शित १९५४ सालच्या ‌‘श्यामची आई‌’ या चित्रपटानंतर असे घडत होते हे विशेषच होते. (‌‘श्यामची आई‌’ या चित्रपटाच्या वेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे ते पहिलेच वर्ष होते हे आवर्जून सांगायलाच पाहिजे.) ‌‘श्वास‌’ असा दोनदा (ऑस्कर आणि राष्ट्रपती पुरस्कार) वृत्तपत्राची हेडलाईन आणि न्यूज चॅनेलची ब्रेकिंग न्यूज होती. नेहमीप्रमाणेच अथवा सिस्टीमनुसार दोन्ही वेळा (पण काही दिवसांच्या अंतराने) ही बातमी नवी दिल्लीवरून दुपारी एका भव्य पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली आणि बघता बघता/ऐकता ऐकता/ सांगता सांगता सगळीकडे ती पोहचली, पण तेव्हा याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेल्या बालकलाकार अश्विन चितळे याची प्रतिक्रिया काय होती माहित्येय? तेव्हा तो शालेय वयात होता. पिक्चरमध्ये त्याला पाहताना त्याचे शालेय वय लक्षात येतेच. त्याला ही सुवर्णपदकाची बातमी समजली तेव्हा तो आपल्या घरीच होता आणि अशातच तो म्हणाला, आज सकाळीच ही बातमी जाहीर झाली असती तर ती मला माझ्या शाळेतील टीचरना पहिल्यांदा सांगता आली नसती का? मला भाव खात शाळेत फिरता आले असते… गंमत म्हणजे, हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा तुला काय वाटले? मीडियाच्या अशा हुकमी प्रश्नावर त्याने चक्क हेच उत्तर प्रामाणिकपणाने दिले. त्याचे हे बोल काही ठिकाणी चौकटीची गोष्ट ठरली, कारण पिक्चर हिट असल्याने तो स्टार होता आणि त्याच्या बोलण्याला वलय आले होते. कालांतराने आपल्या मुलाखतीत हीच गोष्ट तो रंगवून खुलवून आठवणीने सांगू लागला. अर्थात, त्याची ती उत्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे त्याचे वयच तसे होते हे जसे खरे तसेच ‌‘श्वास‌’बद्दल ज्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या, त्यात ही वेगळीच आहे की नाही सांगा? अश्विन चितळेचा आनंद वाढावा अशी गोष्टही घडली. त्याला काही दिवसांतच याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्राप्त झाला. म्हणजेच त्याला एकाच भूमिकेसाठी आनंदीत होण्यास त्याला तीनदा संधी मिळाली.
बालकलाकारांसाठी आता चित्रपट, मालिका असे बरेच पुरस्कार आहेत. त्यात तीन नामांकनेही आहेत. म्हणजेच तीन बालकलाकारांत स्पर्धा आणि रंगलेल्या इव्हेन्टसमध्ये एकाच्या नावाची घोषणा. म्हणजेच उर्वरित दोघांची समजून घालण्याची जबाबदारी त्याच्या पालक व दिग्दर्शकाची.
बालकलाकाराच्या पुरस्काराचे फंडे अनेक. त्याची ही एक झलक. कलाकाराला पारितोषिकाचा आनंद होतोच, पण ज्या भूमिकेवर आपण भरपूर मेहनत घेतलीय तोच चित्रपट महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवासाठी पाठवलाच नसेल तर? रंजनाला राजदत्त दिग्दर्शित श्री अष्टविनायक चित्र निर्मित, निर्माते अरविंद सामंत यांच्या ‌‘अरे संसार संसार‌’ (१९८१) आणि किशोर मिस्कीन निर्मित आणि व्ही.के. नाईक दिग्दर्शित ‌‘गुपचूप गुपचूप‌’ (१९८३) या चित्रपटातील अभिनयासाठी राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला, पण रंजनाला अपेक्षित होते की, व्ही. शांताराम दिग्दर्शित ‌‘चानी‌’ (१९७७) आणि मनोहर रणदिवे निर्मित आणि राजदत्त दिग्दर्शित ‌‘मुंबईचा फौजदार‌’ (१९८४) यातील शकूच्या अभिनयासाठी हा पुरस्कार प्राप्त होईल, पण तसे घडले नाही. रंजनाच्या सर्वात जास्त अपेक्षा अनंत माने निर्मित आणि दिग्दर्शित ‌‘सुशीला‌’ (१९७८) या चित्रपटावर होत्या, पण तो चित्रपट या स्पर्धेसाठी पाठवलाच नाही, मात्र याच चित्रपटासाठी फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला. त्यावर काही बोलण्यापेक्षा रंजनाने या भूमिकेवर बोलणे पसंत केले. ही भूमिका साकारण्यापूर्वी लीला गांधी या चक्क तमाशा थिएटरमध्ये घेऊन गेल्या. तेथील सगळं वातावरण डोळ्यात साठवलं आणि मग ही भूमिका साकारली. तसं करणे खूप पत्थावर पडले असे रंजनाचे म्हणणे होते. सध्या चित्रपट पुरस्काराचे युग आहे, यानिमित्ताने या काही गोष्टी.
खरंतर दादासाहेब फाळके यांच्या ३० एप्रिल या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी राज्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आणि दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेला पहिला चित्रपट ‌‘राजा हरिश्चंद्र‌’ हा चित्रपट ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला, यानिमित्ताने दरवर्षी भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो, दुर्दैवाने कोरोना काळात हे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

– दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे ग्रामस्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Leave a Reply