Breaking News

जिल्हा परिषद शिक्षकाची उत्तुंग भरारी ; जगदिश ऐनकर शास्त्रीय संगीत परीक्षेत देशात प्रथम

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेत शिकविणारे प्राथमिक शाळेचे शिक्षक जगदिश ऐनकर यांनी आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे. शास्त्रीय संगीतात मध्यमा परीक्षेत ऐनकर देशात प्रथम आले असून, त्यानिमित्ताने त्यांना भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून सन्मानित करण्यात आले आहे.

कर्जतच्या ग्रामीण भागात खांडस गावात राहणारे जगदिश ऐनकर यांनी आपले शिक्षण पूर्ण करून रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळवली. गायनाची आवड असलेल्या जगदिश यांनी लहानपणापासून स्थानिक गुरूंकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले, पण त्यात त्यांना पूर्ण समाधान मिळत नव्हते. त्यामुळे ऐनकर यांनी कर्जत तालुक्यातील एका कोपर्‍यात असलेल्या जामरुख येथील शाळेत कार्यरत असूनदेखील दररोज होणार्‍या प्रवासाचा विचार न करता शास्त्रीय संगीताचे ज्ञान घेण्याचा निर्णय घेतला. स्थानिक असल्याने आपली नोकरीची सेवा पूर्ण वेळेत देऊन जगदिश हे जामरुख येथून सायंकाळी दररोज कर्जत शहरात असलेल्या स्वरश्री संगीत क्लासेस येथे येऊन शिक्षण घेऊ लागले. दोन वर्षे खडतर अभ्यास करून जगदिश ऐनकर यांनी नोव्हेंबर 2018मध्ये भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाकडून घेण्यात आलेली मध्यमा पूर्ण ही शास्त्रीय संगीत गायन परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल मे 2019मध्ये जाहीर झाला असून कर्जतच्या स्वरश्री क्लासेसच्या यशात ऐनकर यांनी मानाचा तुरा रोवला आहे. सदर क्लासचे विद्यार्थी असलेले प्राथमिक शाळेचे  शिक्षक जगदिश ऐनकर यांनी संपूर्ण भारतात मध्यमा पूर्ण या श्रेणीत पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे ऐनकर यांना भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून देण्यात येणारा पंडित शंकरराव व्यास आणि कै. अनंतराव कुलकर्णी या दोन मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जगदिश ऐनकर यांच्या या यशाने कर्जत तालुक्यातील संगीत क्षेत्राला शास्त्रीय संगीतातील तज्ज्ञ संगीतकार लाभला आहे. या यशाबद्दल ऐनकर यांचे कर्जत तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply