सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना
रोहे : प्रतिनिधी
ग्रामदैव श्री धावीर महाराज पालखी उत्सवाला शनिवारी (दि. 16) पहाटे सुरुवात झाली. मंदिरात धार्मिक विधी, पूजा, आरती झाल्यानंतर रायगड पोलीस दलाच्या वतीने रोह्याचे निरीक्षक संजय पाटील आणि पोलीस पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र सलामी दिली. पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे आदींनी दर्शन घेतल्यानंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांचा पालखी उत्सव सुरू झाला.
श्री धावीर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख व उत्सव समिती अध्यक्ष शैलेश कोळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रोहे शहरात ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. जागोजागी सुबक व आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. पालखी मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवर्षाव करून पालखीचे स्वागत करण्यात आले. सर्व जातीधर्मांतील भाविकांनी श्री धावीर महाराजांचे दर्शन घेत पूजा केली. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत हा पालखी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे.
नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगराध्यक्ष भाजप नेते संजय कोनकर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, सरचिटणीस मिलिंद पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, शहर अध्यक्ष अमित उकडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख समीर शेडगे, लालताप्रसाद कुशवाह, सुभाष राजे, अॅड. सुनील सानप, नगरसेवक महेंद्र गुजर, महेश कोल्हटकर, राजेंद्र जैन, समीर सकपाळ, महेंद्र दिवेकर, पूजा पोटफोडे, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, तहसीलदार कविता जाधव यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिक या वेळी उपस्थित होते. श्री धावीर महाराज देवस्थान ट्रस्ट व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.