Breaking News

पनवेल महापालिकेची प्रतिमा आयकॉनिक बनावी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासामध्ये पनवेल महापालिका अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. या महापालिकेने नऊ वर्षामध्ये देशपातळीव विविध सन्मान मिळवलेले आहेत. महापालिकेची वास्तू जशी आयकॉनिक इमारत बनते आहे तशीच मनपाची प्रतिमाही आयकॉनिक बनावी यासाठी आयुक्त मंगेश चितळे व सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना आमदारमहोदयांनी शुभेच्छा दिल्या.
पनवेल महापालिकेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्ताने बुधवारी (दि. 1) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
पनवेल महापालिका विविध विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांशी जोडली जात आहे. येथे विमानतळ सुरू झाल्यावर पनवेलचे नाव देश पातळीवर येणार असल्याचे सांगून अनेक आव्हानांना तोंड देत, नागरिकांचे हित जपत आपण पुढे जायचे आहे. दशकपूर्ती वर्षारंभ करत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेशी जोडले जात असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले.
आयुक्त मंगेश चितळे म्हणाले की, पनवेल महापालिका दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. दशकवर्षपूर्ती वर्षारंभ करताना समाजातील सर्व घटकांचा विचार करून सर्व समावेशक अशा 12 विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये सदिच्छा चषक क्रिकेट स्पर्धा, संस्कृती संवर्धन महोत्सव, बेरोजगार मेळावा, ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता संवाद, महापालिका गीत निर्मिती, बाल रंगभूमी विकास परिषद, महिला सक्षमीकरण उपक्रम, जागर आदिवासी संस्कृतीचा अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असेल. आयुक्तांनी या वेळी गेल्या नऊ वर्षातील वाटचालीचा व महापालिकेला मिळालेल्या पारितोषिकांची माहित देत आढावा घेतला. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, राज्य शासन, माजी आयुक्त, अधिकारी व कर्मचारी यांच्या साथीने आजवरचा प्रगतीशील पनवेलचा प्रवास झाला असल्याचे सांगितले. यापुढेही या सर्वांचे सहकार्य मनपास राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या वेळी अग्निशमन विभागाच्या दोन अद्ययावत गाड्यांचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, अस्थीरोग, कान नाक घसा तपासणी, सर्वसामान्य तपासणी, कर्करोग तपासणी, ईसीजी, एक्स रे, स्त्रीरोग तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या.
कार्यक्रमास माजी नगरसेवक अनिल भगत, अरुणकुमार भगत, प्रकाश बिनेदार, बबन मुकादम, माजी नगरसेविका चारूशीला घरत, प्रिती जॉर्ज, सुरेखा मोहोकर, सारिका भगत, नीता माळी, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मंगला माळवे, अभिषेक पराडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, सहाय्यक संचालक नगररचना केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, सुबोध ठाणेकर, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर आदी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्राच्या लोकधारेमधील विविध गाण्यांच्या माध्यमातून करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी उपायुक्त स्वरूप खारगे (मालमत्ता कर विभाग) यांच्या संकल्पेनेतून व नेतृत्वाखाली स्वराज्याची गाथा शिवराज्याभिषेक या नेत्रदीपक संगीतनाट्याने दिमाखदारपणे करण्यात आली. या संगीत लघुनाट्यामध्ये मालमत्ता कर विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply