Breaking News

पनवेलमध्ये विकासाची गंगा अविरत सुरू राहील -भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

महापालिका क्षेत्रात 325 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचे झपाट्याने नागरीकरण होत असून हे क्षेत्र एज्युकेशन हब म्हणून पुढे येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महापालिका दत्तक घेतली आहे. त्यामुळे यापुढेही नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतानाच विकासाची गंगा अविरतपणे सुरू राहील, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.15) येथे दिली.
कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सुमारे 325 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पनवेल येथील लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयात मार्गदर्शानात्मक कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्या वेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, आयुक्त मंगेश चितळे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारूशीला घरत, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, आरपीआयचे पनवेल महापालिका जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्यासह सर्व मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
या वेळी पिसार्वे तलाव पुनर्जीवित व सुशोभीकरण, कोयनावेळे व घोट या गावांना जोडणार्‍या रस्त्यावरील तळोजा नदीवरील पूल, खारघर सेक्टर 19मधील भूखंड क्र.14 येथे प्रभाग कार्यालय व सेक्टर 36मधील भूखंड क्र. 13 येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कळंबोली सेक्टर 8मधील सन शाईन सोसायटीपर्यंत काँक्रीट रस्ता व सेक्टर 8 ई मधील भूखंड क्र. 6, 7 व 8 येथील प्रभाग कार्यालय, कामोठे सेक्टर 11मधील भूखंड क्र. 1 बी येथील प्रभाग कार्यालय, तक्का येथे डोमिनोजसमोरील मोकळ्या जागेत येथे कोळी समाजाचे शिल्प आणि लोकनेते दि.बा. पाटील शाळा येथे ‘दिबां’बद्दल माहिती दर्शविणारे म्युरल व सुशोभित कक्ष यांचे लोकार्पण करण्यात आले.
याचबरोबर नवीन पनवेल सेक्टर 18मधील भूखंड क्र. 8-अ, 8-ब या भूखंडावर उभारण्यात येणारे माता व बालसंगोपन केंद्र, पनवेल बसस्थानकामागे प्रधानमंत्री आवास योजना व मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत कुष्ठरोग पीडितांसाठी व खुल्या विक्रीसाठी प्रस्तावित गृह प्रकल्प, महापालिका हद्दीतील लायन्स गार्डन ते पीडब्ल्यूडी ऑफीस ते जुने कोर्ट ते बंदर नाका काँक्रीटीकरण रस्ता आणि प्रभाग समिती ड येथील भूखंडावर व्यावसायिक दुकाने बहुमजली वाहनतळाच्या कामाचे भूमिपूजन झाले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करताना सांगितले की, पूर्वी नगर परिषद असलेल्या पनवेलचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर या भागाचा विकास व्हावा ही लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची नेहमीच तळमळ राहिली आहे. पनवेल महापालिकेच्या निर्मितीपासून ते तिच्या वाढीपर्यंत मी साक्षीदार आहे. या महापालिकेच्या स्थापनेपासूनच पनवेलच्या विकासकामांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण आग्रह राहिला आहेे. द्रष्टे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून महापालिकेला बळ देण्याचे काम सुरू असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. आज या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन होत असताना पनवेलमध्ये आश्वासक कार्य झाल्याचे स्पष्ट दिसत आहेे.
पनवेल महापालिकेची भव्य प्रशासकीय इमारत कोकण व मुंबईचे प्रवेशद्वार ठरत आहे. 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय पूर्णत्वास गेले आहे. माता-भगिनींसाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे. वैद्यकीय सुविधांच्या विस्तारासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. महापालिकेच्या शाळा सुसज्ज व दर्जेदार असून लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयाचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी विशेष उल्लेख केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोकडून 341 भूखंड महापालिकेकडे वर्ग करण्यात आले असून याचा मोठा फायदा महापालिकेला झाला आहे. नव्याने स्थापन झालेली महापालिका असली तरी पनवेलमध्ये विकासाचे पर्व कायम राहणार असून स्पष्ट विचारधारा व दूरदृष्टी ठेवून काम सुरू आहे. अल्पावधीतच पनवेल महापालिकेने नागरिकांना केंद्रबिंदू मानून प्रभावी कामगिरी केली आहे. गतिमान, प्रगतीवान आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर व व्यासपीठावरील सर्वांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच पनवेल महापालिका ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात जाईल, असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वागत व आभार व्यक्त केले. त्यांनी पुढे म्हटले की, आपले शहर मोठे आणि सक्षम व्हावे ही प्रत्येकाची भावना असते. त्या अनुषंगाने महानगरपालिका कायम प्रयत्नशील राहिली आहे. त्यामुळे झपाट्याने विकासाची गंगा आली. ग्रामीण भागाला विशेषतः 29 गावांचा समावेश महापालिकेत झाला तेथे प्रथम सुविधा दिल्या पाहिजेत यासाठी काम झाले. आमदार म्हणून न्हावा शेवा टप्पा 3 योजनेचा पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार फेब्रुवारी 2026ला हे काम पूर्ण होणार असून त्यामुळे मुबलक आणि नियमित पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर शिलार धरणातून पनवेलला पाणी उपलब्धता होणार आहे याबद्दल गणेश देशमुख व मंगेश चितळे यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
खारघर टोलचा प्रश्न होता तेव्हा देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमाफी करण्याचे आश्वासन मला दिले आणि तो शब्द खरा केला. सिडकोकडे अनेक भूखंड होते, ते मी अध्यक्ष असताना महापालिकेला वर्ग करून परत मिळवता आले. मैदाने, बगीचे, आरोग्य केंद्र अशीही अनेक कामे मार्गी लागली. विशेष म्हणजे सर्वात जास्त आरोग्य केंद्र असलेली पनवेल महानगरपालिका ठरली आहे. या महापालिकेला विकासाचे रूप मिळाले आणि ते रूप प्रत्यक्षपणे साकार होत आहे. पुढील काळातही विकासाचा हा प्रवाह सुरूच राहील. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलचे नाव जागतिक नकाशावर झळकले आहे. जनतेने वेळोवेळी दिलेल्या आशीर्वादांमुळेच हे शक्य झाले असून पुढेही हेच पाठबळ मिळेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
पनवेल महापालिकेने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयुक्त मंगेश चितळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. आमदार विक्रांत पाटील यांचेही या वेळी भाषण झाले. प्रास्ताविकात आयुक्त मंगेश चितळे यांनी यांनी विकासकामांच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply