Breaking News

शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील अध्यक्ष असलेल्या संस्थेची शाळा बेकायदा

पुरुषोत्तम भोईर, मुख्याध्यापिका रूपा शेट्टी यांच्यावरही गुन्हा दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त
आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल या संस्थेचे अध्यक्ष बाळाराम पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रूपा जिवन शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा शाळा सुरू करून विद्यार्थी व त्यांच्या पालकांची आणि शासनाची गंभीर फसवणूक केल्याबद्दल प्रशासनाकडून खांदेश्वर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 कलम 318(4), भारतीय न्याय संहिता (बी एन एस) कलम 5(3), बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्कअधिनियम, 2009 अन्वये 18(5) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकांची फसवणूक करणे हा पुरुषोत्तम भोईर याचा फंडाच आहे. त्याने विविध अनेक प्रकरणात लोकांची फसवणूक केली आहे. भावी पिढीच्या आणि आयुष्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण हि अत्यंत महत्वाची बाब आहे. जमीन जागेच्या फसवणूक करण्याबरोबर त्याने आता शिक्षणाच्या पवित्र कामातही घोटाळा केला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य त्याने टांगणीला लावून मोठी फसवणूक केली आहे. त्याने पालकांची माफी मागून आणि विद्यार्थी व पालकांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसानाची भरपाई करून दिली पाहिजे, असे विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाची कोणतीही मान्यता नसताना चालविल्या जाणार्‍या अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने विचुंबे येथील आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा अनधिकृतरित्या चालविली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 अंतर्गत फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीचे पनवेल गट शिक्षणाधिकारी शाहू बाबुराव सतपाल यांनी दिली.
शासनाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकार्‍यांना विनापरवाना चालविल्या जाणार्‍या शाळांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत प्राधिकृत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील विविध गावांतील एकूण 13 संशयित अनधिकृत शाळांची तपासणी सुरू आहे. या कारवाईदरम्यान आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल, विचुंबे ही शाळा कोणतीही शासन मान्यता, नाहरकत प्रमाणपत्र नसताना चालविली जात असल्याचे आढळून आले. या शाळेला स्वतंत्र UDISE कोड नसून, इतर शाळेचा णऊखडए कोड बेकायदेशीररित्या वापरला जात असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे.
13 नोव्हेंबर 2025 रोजी गट शिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांनी शाळेस प्रत्यक्ष भेट दिली असता शाळा सुरू असल्याचे आढळून आले. या आधीच शाळा तत्काळ बंद करून विद्यार्थ्यांना नजीकच्या मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश देण्याबाबत नोटीस देण्यात आली होती, मात्र सदर नोटीसचे पालन करण्यात आलेले नाही. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 च्या कलम 18 नुसार कोणतीही शाळा शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय सुरू करता येत नाही. तसेच अधिनियमाच्या कलम 18(5) नुसार अशा उल्लंघनाबाबत फौजदारी शिक्षा व दंडाची तरतूद आहे.
या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्या प्रवेश देणे, त्यांच्याकडून शैक्षणिक फी आकारणे तसेच शासनाची व पालकांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणी सदर शाळेचे अध्यक्ष, स्थानिक स्कूल कमिटीचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापिका यांच्याविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सन 2014 पासून आजपावेतो बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 च्या कलम 18 नुसार कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाची मान्यता, ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय सुरू करता येत नाही, अशी स्पष्ट तरतूद असतानादेखील आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल, विचुंबे, ता. पनवेल, जि. रायगड ही शाळा अनधिकृतरित्या स्थापन करून चालविण्यात येत होती.
या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे प्रवेश देण्यात आला असून, त्यांच्याकडून शैक्षणिक फी आकारण्यात आली आहे. तसेच शासनास देय असलेला कोणताही कर न भरता, बेकायदेशीर पद्धतीने इतर शाळेचा UDISE कोड वापरून शासनाची, विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची फसवणूक करण्यात आलेली आहे.
यामुळे शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यावरही अनधिकृत शाळा चालवण्याचा ठपका आहे आणि तीच री त्यांचे समर्थक पुरुषोत्तम भोईर याने ओढत विद्यार्थी आणि पालकांचे अतोनात नुकसान व हाल केले आहेत. आता या प्रकरणी पोलीस आणि प्रशासन किती वेगाने कारवाई करते, याकडे सर्व पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.

अनधिकृत शाळांवर कठोर कारवाई होणार
पनवेल तालुक्यातील इतर अनधिकृत शाळांवरही यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश केवळ शासनमान्य शाळांमध्येच घ्यावा व शाळेची मान्यता, UDISE कोड व शासकीय नोंदणी तपासूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply