उलवे नोड : रामप्रहर वृत्त
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. येत्या 7 फेबु्रवारी रोजी मतदान होणार असून त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 4) भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उलवे परिसरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातून महायुतीने शक्तिप्रदर्शन केले.
उलवे सेक्टर 19मधील भाजप कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली सेक्टर 17, शेलघर, कोपर, गव्हाण, न्हावा, शिवाजीनगर, मोरावे आणि वहाळ अशा विविध सेक्टरमधून मार्गक्रमण करत सेक्टर 25 ए येथे सांगता झाली. या रॅलीमुळे संपूर्ण परिसर भाजप महायुतीमय झाल्याचे पहायला मिळाले.
या भव्य रॅलीमध्ये भाजप नेते रविशेठ पाटील, उमेदवार निकिता खारकर, जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे तसेच निलेश खारकर, उत्तम कोळी, सुहास गोंधळी, अखिलेश यादव, किशोर कोळी, विशाल कोळी यांच्यासह महायुतीचे इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी बोलताना भाजप महायुतीचे वहाळ पंचायत समिती गणाचे उमेदवार वितेश म्हात्रे यांनी विरोधकांकडे सक्षम उमेदवार शिल्लक नसल्याने त्यांनी आमच्यातीलच व्यक्तीला फोडून उमेदवारी दिली, हीच त्यांची पहिली हार असल्याची टीका केली. उलवे परिसराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे एकमेव ध्येय असून पक्ष व कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागल्याचे त्यांनी सांगितले. गव्हाण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार निकिता खारकर यांनी महिला सक्षमीकरणावर आपला भर राहणार असल्याचे सांगितले. प्रचारादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Check Also
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …
RamPrahar – The Panvel Daily Paper