Breaking News

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने महासंस्कृती जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी (दि. 1) दुपारी 12 वाजता उलवे नोड येथील लोकनेते दि.बा. पाटील भूमिपुत्र भवनात होणार आहे. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजनेंतर्गत धनादेश वाटप केले जाणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य वितेश म्हात्रे, जिज्ञासा कोळी व इतर मान्यवर पाहुणे उपस्थित असणार आहेत.
भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेत स्त्री ही शक्ती, त्याग आणि प्रेरणेचे प्रतीक मानली जाते. महिला लोककलांमध्ये विविध लोकगीत आणि नृत्याचे प्रकार आहेत, ज्यामध्ये पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्यशैलींचा समावेश असतो. महिलांच्या या कला, कौशल्ये आणि सामाजिक स्थानाला योग्य महत्त्व देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याकरिता नृत्य, गीत, नाटिका आणि विविध सादरीकरणांद्वारे स्त्रीशक्तीचा जागर मांडला जाईल.
या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश सर्वांपर्यंत पोचविण्याचा उद्देश आहे. कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून कलाप्रेमींनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजनेंतर्गत धनादेश वाटप करण्यात येणार आहे.

Check Also

सीकेटी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर …

Leave a Reply