Breaking News

चित्रपटाचे यश अन् सेलिब्रेशन

चित्रपट सुपर डुपर हिट होण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक अर्थात प्रेक्षक. या प्रेक्षकांना चित्रपट आवडला रे आवडला की तो अक्षरशः डोक्यावर घेतात, आवडलेले काही चित्रपट कायमच डोक्यात ठेवतात आणि त्याच्या लोकप्रिय गाणी, टाळ्या शिट्ट्यांनी थियेटर डोक्यावर घेतलेले डायलॉग याच्या गोष्टी ते पुढील पिढीलाही रंगवून खूलवून सांगतात आणि असे सुपर डुपर हिट चित्रपट एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात राहतात… चित्रपटाच्या यशातील ही एक महत्त्वाची गोष्ट.
यशस्वी चित्रपट कधीच थांबत नाहीत, पिढी बदलली तरी त्याचे अस्तित्व कायम असते.
प्रेक्षकांना चित्रपट आवडला नाही तर तो पडद्यावरच ठेवतात. छे छे पाहणार नाही असा जणू ते हट्ट धरतात. क्वचित कालांतराने कुठे एखाद्या चित्रपट शब्द कोड्यात त्या चित्रपटाचा काही संदर्भ वा तपशील आलाच तर स्मरणशक्तीला फार ताण देऊन तो चित्रपट आठवतो… सहज आठवू नयेत असे ते चित्रपट असतात.
एकूणच काय तर चित्रपटाच्या यशात चित्रपट रसिकांची भूमिका खूपच महत्त्वाची. म्हणूनच तर ज्या प्रेक्षकांच्या प्रेमावर चित्रपट यशस्वी ठरला त्याच प्रेक्षकांना सोबत घेऊन त्याच्या यशाचा सोहळा आयोजित केला तर त्याचे कौतुक करायला हवेच… चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत असे अधूनमधून घडत असते.
ताजे उदाहरण ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चे अर्धशतक प्लाझा चित्रपटगृहात प्रेक्षकांसह साजरे करण्यात आले त्याचे. हा सोहळा मोठ्या दणक्यात, जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर साकारलेल्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते. चित्रपटाचे यश… यश म्हणतात ते हेच असते. यावेळी घोड्यावरून बालशिवरायांचे आगमन होताच उपस्थितांमध्ये उत्साहाची प्रचंड लाट उसळली, तर शिवगर्जना ऐकताना प्रेक्षक स्तब्ध झाले, पुढच्याच क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला. घोषणांचा नाद, मराठी अस्मितेचा अभिमान आणि जल्लोषमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देत हा विशेष सोहळा विद्यार्थी आणि प्रेक्षकांसोबत साजरा केला.
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी असलेला हा चित्रपट आणि शिवरायांचा प्रेरणादायी वारसा या दोन्हींचा संगम आज अनुभवायला मिळाला. प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहाताना मिळालेलं समाधान वेगळंच आहे. ते शब्दांत मांडणं अशक्यच. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य आहे.
हेमंत ढोमे अगदी बरोबर बोलला. आपला चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असून त्यातून कळत नकळतपणे प्रबोधन करणे असा त्याचा दृष्टिकोन असल्याचे नेहमीच जाणवते.
या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षीती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून निर्मितीची धुरा क्षीति जोग यांनी सांभाळली आहे.
प्रेक्षकांसोबत आपल्या चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन करण्याचे असे योग अधूनमधून येत असतात. अशाच काही आठवणी सांगायला हव्यात.
आपला एकामागोमाग एक मराठी चित्रपट सुपर डुपर हिट ठरतोय ही एक हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यासाठी अतिशय उत्तम संधी आहे असे वाटत असतानाच दादा कोंडके यांनी ’तेरे मेरे बीच मे’ (1984) आपल्या व्दैर्थी विनोदाच्या शैलीत पडद्यावर आणला (दादांनी आपल्याच ’तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटाची हिंदीत रिमेक केली होती. अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक हिंदीत गेल्यावरही तिकडच्या संस्कृतीनुसार काम करत नाहीत असे पूर्वी अनेकदा घडे.). मुंबईत इंपिरियल चित्रपटगृहात ’तेरे मेरे बीच मे’ रौप्य महोत्सवी यश संपादन करीत असतानाच हैदराबाद शहरातही या चित्रपटाने खणखणीत पंचवीस आठवड्याचे रौप्य महोत्सवी यश प्राप्त केले आणि दादांनी ठरवले आपल्या या पहिल्या हिंदी चित्रपटाच्या सुपर डुपर हिटचा सोहळा हैदराबाद येथील चित्रपटगृहात पब्लिकसोबत साजरा करायचा. दादांच्या चित्रपटाची वितरण व्यवस्था चोखपणे बजावत असलेल्या विजय कोंडके यांनी लगोलग नियोजन केले आणि मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारानांही या सोहळ्यासाठी हैदराबादला नेले. मला आठवतंय, पिक्चर सुपर डुपर हिटने दादा कोंडके यांची तिकडे जबरदस्त क्रेझ निर्माण झाली होती. दादा कोंडके महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय होते. चित्रपटाचे यश बरेच काही घडवत असते. हाऊसफुल्ल गर्दीकडून दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांना मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आनंद झाला. तेलगू भाषिक राज्यात दादा कोंडके यांच्या यशाचा झेंडा फडकवला होता. हैदराबादमधील मराठी भाषिक चित्रपट रसिकही यावेळी भेटले.
आपला पहिला हिंदी चित्रपट रौप्य महोत्सवी यशस्वी ठरलेल्या अशा हैदराबाद शहरातील चित्रपटगृहातच सोहळा करण्याची ही कल्पना भन्नाट होती. काही वेगळे केले तर ते अधोरेखित होत असते.
निर्माता सुधाकर बोकाडे नेहमीच काही विशेष गोष्टी करण्यात रस असलेला सिनेमावाला. आणि मिडिया फ्रेंडली. त्यामुळे सुधाकर बोकाडे जे जे काही करणार त्याची बातमी होणार हे ठरलेले. बोकाडे निर्मित आणि लॉरेन्स डिसोझा दिग्दर्शित ’साजन’ (1991) या चित्रपटाचा रौप्य महोत्सवी सोहळा चक्क दोनदा साजरा केला. त्यात एक होता या म्युझिकल सुपर डुपर हिट चित्रपटाने दक्षिण मध्य मुंबईतील ड्रीमलॅण्ड चित्रपटगृहात रौप्य महोत्सवी यश संपादन केले त्याच चित्रपटगृहात हा सोहळा आयोजित केला. या चित्रपटाचे संगीतकार नदीम श्रवण यांच्या शुभ हस्ते ड्रीमलॅण्ड चित्रपटगृहाचे वॉचमन, डोअर किपर, बुकिंग क्लार्क, ऑपरेटर वगैरे वगैरे सगळ्यांनाच ’साजन’ रौप्य महोत्सवी स्मृती चिन्ह देण्यात आले. या चित्रपटाच्या यशात गीत संगीताचा अतिशय महत्त्वाचा सहभाग असल्याने संगीतकाराच्या हस्ते ही स्मृतीचिन्ह देण्यात आली हे अतिशय उत्तम झाले. आणि चित्रपटाच्या यशात चित्रपटगृहाचाही खूप महत्त्वाचा वाटा असतोच. नव्वदच्या दशकापर्यंत तर हिंदी चित्रपट प्रदर्शित करताना त्याचे दक्षिण मुंबईतील मुख्य चित्रपटगृह कोणते असावे वा असेल याला फार फार महत्त्व असे. चित्रपटाच्या जगात हीदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. ’साजन’ चा आणखी एक रौप्य महोत्सवी यशाचा ग्लॅमरस सोहळा अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रंगला. माधुरी दीक्षित आपल्या आई वडिलांसोबत आली आणि ट्रॉफी स्वीकारताच निघालीदेखिल. तशी ती फिल्मी पार्टीत क्वचितच येणारी हा आम्हा चित्रपट पत्रकारांचा लाईव्ह अनुभव.
राजश्री प्रॉडक्शन निर्मित व सुरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ’हम आपके है कौन’ (1994)च्या यशाचा झगमगाट आजही कायम आहे. आपल्या देशातील लग्न संस्कृतीत ग्लॅमर आणण्याचे श्रेय याच चित्रपटाकडे जाते. चित्रपट प्रदर्शित होताना ’ही तर लग्नाची व्हिडिओ कॅसेट’ अशी त्याची थट्टा केली गेली. हा महाकौटुबिक मनोरंजक चित्रपट सुरुवातीला संपूर्ण मुंबईत फक्त आणि फक्त लिबर्टी चित्रपटगृहात महागड्या तिकीट दराने प्रदर्शित झाला. नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्गाकडून या चित्रपटाचे जोरदार स्वागत करण्यात आले आणि काही आठवड्यांनी मुंबई उपनगरात हा चित्रपट प्रदर्शित झाला. तोपर्यंत या चित्रपटाच्या गीत, संगीत, नृत्याची लोकप्रियता वाढली होती. काही आठवड्यांनी बोरिवली येथील जया चित्रपटगृहात प्रेक्षकांसह या खणखणीत यशाचे दिलखुलास सेलिब्रेशन करायचे ठरले, येथपर्यंत ठीक हो, पण चक्क माधुरी दीक्षित या इव्हेंटला येणार आहे हे नुसतं जाहीर झाले आणि अनेकांची दिल की धक धक वाढत वाढत गेली. जया चित्रपटगृहाला चित्रपट रसिकांच्या पडलेल्या प्रचंड गर्दीने घातलेल्या वेढ्यातून माधुरी दीक्षितने कसा बसा मार्ग काढत काढत बाल्कनी गाठली. वृत्त वाहिन्या आणि मोबाईल येण्यापूर्वीचे ते छान दिवस होते. माधुरी दीक्षितला पाहता पाहता हृदयात जपून ठेवावे असे ते वातावरण होते. प्रत्यक्ष हाऊसफुल्ल गर्दीत जाऊन आपल्या चित्रपटाचे यश सेलिब्रिट करणे हा संवेदनशील कलाकारासाठीही एक सकारात्मक आनंद असतो.
सगळं काही प्रेक्षकांच्या प्रेमावर असतं. त्यांनी तुमचा चित्रपट लोकप्रिय केला आहे ना? तर मग चला, त्यांच्यासोबत यश सेलिब्रिट करुयात, त्यांच्यासाठी तो एक भन्नाट लाईव्ह अनुभव असतो, कायमच आठवणीत ठेवण्यासाठी…

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

सीकेटी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर …

Leave a Reply