पनवेलमध्ये वंदे मातरम् 150 वर्षे थीमने रंगला सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त
मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा गुरुवारी (दि. 19) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. जिल्ह्याच्या सर्वच भागात शोभायात्रा काढून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पनवेल शहरात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघालेल्या भव्य शोभायात्रेत संस्कृतीचे दर्शन घडले.
गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी मंगलमय वातावरण होते. सकाळी दारात गुढी उभारून तिचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा निघाल्या. पनवेलमध्ये नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित या शोभायात्रेने यंदा भव्यतेचा नवा उच्चांक गाठला.
या दिमाखदार शोभायात्रेला शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथून उत्साहात सुरुवात झाली. त्यानंतर ही मिरवणूक कर्मवीर भाऊराव पाटील चौक, टपाल नाका शनी मंदिर, महात्मा गांधी मार्ग, मिरची गल्ली, कापड बाजार, जय भारत नाका आणि लोकमान्य टिळक मार्ग या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे भव्य समारोपास पोहचली.
दरम्यान, टिळक रोड, यशोमंगल नाका आणि सावरकर चौक परिसरात नववर्ष स्वागत समिती आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेली आकर्षक सजावट, रोषणाई आणि भगव्या पताकांनी सजलेले रस्ते पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते. ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा थरारक ताल, पारंपरिक वेशभूषेत सजलेले युवक-युवती आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण अक्षरशः दणाणून गेले होते.
यंदाच्या शोभायात्रेचे सर्वात मोठे आकर्षण ठरली वंदे मातरम् या राष्ट्रगीताच्या 150 वर्षांच्या गौरवाची भव्य थीम. देशभक्तीने भारलेले चित्ररथ, जिवंत देखावे आणि प्रभावी सादरीकरणांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. स्वातंत्र्य, संस्कृती आणि राष्ट्रीय अभिमान यांचा संगम या मिरवणुकीत ठळकपणे अनुभवायला मिळाला.
परिसरातील तब्बल 14 संस्थांचे भव्य आणि आकर्षक चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक चित्ररथाने आपल्या कलात्मकतेने आणि संदेशाने प्रेक्षकांची मने जिंकली तसेच युवानाद ट्रस्ट तर्फे ध्वज-लेझीम-ढोल पथकात सुमारे 150 मुलांनी सहभाग घेत पारंपरिक सादरीकरणाने वातावरण भारून टाकले.
या दिमाखदार सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर नितीन पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा नेते प्रितम म्हात्रे, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, राजू सोनी, सुमित झुंझारराव, नगरसेविका रूचिता लोंढे, प्रिती जॉर्ज, शिवानी घरत, अभिषेक पटवर्धन, केदार भगत, अमित ओझे, रूपेश नागवेकर, माधुरी गोसावी यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, विविध पक्षांचे मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह, परंपरा, संस्कृती आणि देशभक्तीचा संगम साधणारी पनवेलची ही शोभायात्रा भव्य, दिव्य आणि अविस्मरणीय ठरली आणि नववर्षाच्या स्वागताला या शोभायात्रेने खर्या अर्थाने ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवले.
RamPrahar – The Panvel Daily Paper