उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
राज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती देत आहोत. १ मेपासून राज्यभर फिश पाव स्टॉल संकल्पना सुरू करून युवक व महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसायमंत्री म्हणून कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. उलवे येथे आधुनिक व सुसज्ज मच्छी मार्केट उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी केली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गव्हाण येथे आयोजित उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन रविवारी मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी हे सातत्याने मच्छीमारांचे प्रश्न विधीमंडळात मांडत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या आगरी-कोळी महोत्सवाच्या निमित्ताने मच्छीमार समाजाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. सिडकोमुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची टीका करत आमच्या जमिनी अत्यल्प दरात घेऊन आता प्रचंड दराने देण्याची पद्धत अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आमदार महेश बालदी यांनी कोळी समाजाच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित करत गव्हाण, न्हावा, गणेशपुरी, कोंबडभुजे या भागांमध्ये नवीन जेटी उभारण्याची मागणी केली. करंजा बंदरामुळे मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगत भविष्यात आशियातील सर्वात मोठे बंदर येथे उभारले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार महेश बालदी पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष एक कुटुंब म्हणून काम करत असून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जे.एम. म्हात्रे यांची जोडी शेकापला शून्यावर आणू शकते. त्यासाठी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करावे.
सी-फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभाला रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, योगिता लहाने, वर्षा केवाळे, भाऊशेठ पाटील यांच्यासह आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …
RamPrahar – The Panvel Daily Paper